(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Govind Pansare : कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त, नवीन तपास अधिकारी नेमण्याचा कोर्टाचा आदेश
Govind Pansare Murder Case: चार आठवड्यात नवीन तपास अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि या प्रकरणात आजवर केलेल्या तपासाचा अहवाल सादर करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
मुंबई: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदारीतून मुक्त करण्यासंबंधी मान्यता हायकोर्टाने दिली आहे. या संबंधी राज्य सरकारने एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कोर्टाने ती याचिका स्वीकारली आहे. पण येत्या चार आठवड्यात नवीन तपास अधिकाऱ्याची नेमणूक करावी असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे हे गेली चार वर्षापासून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कॉ. पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदारीतून मुक्त करावं अशा आशयाची एक याचिका राज्य सरकारने दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडील पदभार बदलण्यास हायकोर्टाची परवानगी दिली आहे. मात्र चार आठवड्यांत नवीन तपास अधिकारी नियुक्ती करून या प्रकरणात आजवर केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून 4 जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 8 आरोपींची एसआयटीकडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या 4 जणांविरोधात 400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, खून करणे या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात 2013 साली डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानतंर 2015 साली कॉम्रेड गोविंद पानसरेंची कोल्हापुरात हत्या करण्यात आली. मात्र तपासयंत्रणा अजूनही अपयशीच असल्याचा, याचिकाकर्त्या कुटुंबियांचा आरोप आजही कायम आहे. मात्र या दोन घटनांनंतर शेजारील राज्यात डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांत तपास पूर्ण होऊन खटल्याला सुरुवातही झाली. तिकडच्या तपासयंत्रणांनी इथं येऊन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तिथं त्यांच्या चौकशीत इकडच्या या दोन हत्यांचे धागेदोरे सापडले. त्यामुळे नक्की राज्यातील तपासयंत्रणा काय करत आहेत?, यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही तपासयंत्रणांना गंभीर होण्याचा इशारा देत जलदगतीनं तपास पूर्ण करण्याचे निर्देश या आधीच दिले होते.
16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरे दाम्पत्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या सागरमळा परिसरात दोन बंदुकीतून प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा जखमी झाल्या होत्या. मात्र कॉ. पानसरे गंभीर जखमी होते. त्यांच्यावर कोल्हापुरातच उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी कॉ. पानसरेंना मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. तब्बल पाच दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.