एकाच शिक्षकाची दोन शाळेवर नियुक्ती करत शासनाची लाखोंची फसवणूक, नांदेड शिक्षण विभागाचा कारनामा
आनंद राजमाने नावाच्या शिक्षकाचे 2014 ते 2016 पर्यंतचे 11 लाख रुपयांचे थकबाकीसह वेतन काढून शासनाची फसवणूक केली आहे. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के व सध्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर हे संबंधित प्रकरणामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे.
नांदेड : एकाच शिक्षकाची दोन ठिकाणी नियुक्ती असताना देखील पगार काढण्यात आल्यामुळे नांदेड जिल्हा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. नांदेड शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व तत्कालीन शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी नांदेड येथील बालक मंदिर प्रथिमिक शाळा जुना मोंढा व कलगीधर प्राथमिक शाळा,लोहार गल्ली नांदेड अशा दोन शाळांमध्ये नियुक्तीस असलेल्या, आनंद राजमाने नावाच्या शिक्षकाचे 2014 ते 2016 पर्यंतचे 11 लाख रुपयांचे थकबाकीसह वेतन काढून शासनाची फसवणूक केली आहे. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के व सध्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर हे संबंधित प्रकरणामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणातील आनंद देशमाने शिक्षक हे सुरुवातीला बालक मंदिर शाळेवर 2015 पासून 2017 पर्यंत कार्यरत होते. परंतु त्या दरम्यान आनंद राजमाने हे नांदेड शहरातील कलगिधर प्रथिमक विद्यालयात 2014 पासून शासन कार्यरत दाखवून 2016 पासून 2021 पर्यंतचे 11 लाखाचे वेतन त्यांना देण्यात आले आहे. यात मुळात जी व्यक्ती 2017 मध्ये बालक मंदिर प्राथमिक शाळेत नियुक्ती असताना त्याला 2016 पासून कलगिधर शाळेवर नियुक्त असल्याचे दाखवून पगार काढून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शेख मुजीब यांनी केली आहे. एकाच शिक्षकाची दोन ठिकाणी नियुक्ती असताना देखील पगार काढण्यात आल्यामुळे नांदेड जिल्हा शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
याविषयी तत्कालीन शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर सध्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून माझी 2018 ला नांदेड येथे नियुक्ती झाली. सदर राजमाने या शिक्षकाचे 2016 पासूनचे वेतन देयक हे तत्कालीन शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी काढल्याचे नमूद केले. परंतु 2018 ते 2021 पर्यंत सदर राजमाने या शिक्षकाच्या नियुक्ती विषयी रितसर तक्रार व चौकसी चालू असताना कोणतीही खातरजमा न करता पुढील वेतन हे शिक्षणाधिकारी दिग्रसकरांनीच काढल्याचे त्यांनी मान्य केलं. तसेच प्रकरणातील शिक्षक आनंद राजमाने यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. परंतु आनंद राजमाने हे 2015 ते 16 या शैक्षणिक वर्षात बालक मंदिर प्राथमिक विद्यालयात इयत्ता पाचवी वर्गावर शिक्षक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाळे यांनी दिली. एवढे सगळे पुरावे असताना आता या प्रकरणाची मूळ संचिका कार्यालयातून गायब झालीय आणि त्याविषयीची तक्रार अद्याप शिक्षण विभागाकडून पोलिसात देण्यात आली नाही. परंतु या प्रकरणात शिक्षणाधिकारी दिग्रसकर जरी दोषी नसले तरी त्यांनी देशमाने हे दोन शाळेवर शिक्षक असल्याची तक्रार असताना स्पष्ट दिसत असताना सहकाऱ्याचा नातेवाईक असणाऱ्या आनंद राजमाने यांचा 2018 ते 2021 पर्यत चा पगार ही त्यांनीच काढला आहे.