Gopinath Munde Birth Anniversary | आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती, भाजपसाठी आयुष्य वेचलेला नेता
12 डिसेंबर हा गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महान नेता ज्यांनी तब्बल 35 वर्षे बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसाठी आयुष्य वेचलं. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार होते.
मुंबई: गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडेनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनतेचा जो वटवृक्ष वाढलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे गोपीनाथ मुंडेंना जातंय.
गोपीनाथ मुंडेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणिबाणी विरोधात त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी अटक करुन त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.
गोपीनाथ मुंडेंनी 1980–1985 आणि 1990–2009 या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. 1992-1995 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. महाराष्ट्रात 1995 साली ज्यावेळी युतीचं सरकार आलं त्यावेळी त्यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.
2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजय मिळवला. लोकसभेत त्यांची भाजपच्या उपनेतेपदी निवड झाली. केंद्रात मोदींचं सरकार आलं त्यावेळी 26 मे रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. केवळ एका आठवड्यानंतर 3 जून रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पंकजा मुंडेचं आवाहन गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर दरवर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या वर्षी कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलंय. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त त्यानी बीडमध्ये प्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचंही त्यांनी आवाहन केलंय.
गोपीनाथ मुंडेच्या जयंती निमित्त अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं आहे.