... तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; कोल्हापुरातून पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य
कोल्हापूरमधील रास्ता रोको आंदोलनाला भेट देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलं.
कोल्हापूर : भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. तर, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते सातत्याने शासन दरबारी आवाज उठवत आहेत. त्यासाठी, धनगर समाजाच्यावतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन समाजामुळेच आपण आमदार झाल्याचंही ते सांगतात. सध्या राज्यात आरक्षणाचा (reservation) मुद्दा सर्वत्र गाजत आहे. त्यामध्ये, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. तर, दुसरीकडे विविध जिल्ह्यात धनगर (Dhangar) समाज बांधवही एसटी प्रवर्गात समावेश करावा, यासाठी आंदोलन करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून 6 जणांचे उपोषण सुरू आहे. तर, आज कोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापूरमधील रास्ता रोको आंदोलनाला भेट देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी धनगर समाज बांधवांमुळे बकऱ्याचं बटण सर्वांना मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातील धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटन खावं लागेल, असं आक्षेपार्ह विधान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. कोल्हापुरात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी तावडे हॉटेल परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी, आंदोलनात सहभागी झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी हे आक्षेपार्ह विधान केले आहे. मला आमदारकी वैगेरे ही समाजामुळे मिळाली आहे, आमचे मेंढपाळ वर्षभर घरी येत नाहीत. आमची मुलं सगळ्यांच्या पाठी फिरतात. आम्हाला गुरासारखं मारलं जातंय.
दरम्यान, शहरातील तावडे हॉटेल परिसरात सकाळी 11 वाजता सुरू झालेलं आंदोलन 12 वाजेपर्यंत सुरू राहिलं. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. या आंदोलनात धनगर समाजाने बकरी देखील रस्त्यावर आणली होती. त्यामुळे, काही काळासाठी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन
नाशिक, पंढरपूर, कोल्हापूर, अकोल्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं आहे. परळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रस्ता रोकोमुळे काही काळ परळी-बीड आणि परळी-परभणी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे, या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला.
हेही वाचा
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन; अजित पवारांनी खडसावल्यानंतर उमेश पाटलांची घोषणा