Gopichand Padalkar : लोकसभेनंतर बघू, पण तोपर्यंत तरी गोड बोला, सांगलीतल्या महायुतीच्या मेळाव्यात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य
Gopichand Padalkar : सांगलीत महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी गोपीचंद पडळकरांनी सूचक वक्तव्य केलं.
सांगली : लोकसभेनंतर बघू, पण तोपर्यंत तरी गोड बोला, त्यानंतर करेक्ट कार्यक्रम करावे लागणार आहेत. असं म्हणत सांगलीतल्या महायुतीच्या मेळाव्यात (Mahayuti Melava) लोकसभा निवडणुकांवर (Loksabha Election) गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) भाष्य केलं. सांगलीत महायुतीच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर आधीच मागा, ज्यावेळी कमळाचे चिन्ह जाहीर होईल त्याच्यामागे आपली ताकद उभी करा, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केलं.
या मेळाव्याला जिल्ह्यातील भाजप खासदार संजय काका पाटील, शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, अजित पवार गटाचे नेते, आमदार, माजी आमदार सदाभाऊ खोत, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार 14 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरात महायुतीच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सांगलीत देखील हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
वैचारिक मतदभेद असू शकतात - गोपीचंद पडळकर
वैचारिक मतभेद असू शकतात पण प्रत्येकाला इच्छा असते ती खासदारकीची. प्रत्येकाने मत, इच्छा व्यक्त करा. पण लोकसभेच्या आधी ज्यांना ज्यांना तिकीट मागायचं त्यांनी मागा. ज्यावेळी कमळाचं जाहीर होईल, त्याच्या मागे आपली ताकद उभी करा, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.
सदाभाऊ खोतांनी व्यक्त केली खदखद
या कार्यक्रमला माजी आमदार सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुका जवळ आल्यावरच भाजपला मित्रपक्षांची आठवण होते असं म्हणत माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली आहे. सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि सेना हे मोठे पक्ष आहेत. छोटे घटक बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे. असे करू नका, आम्हालाही सन्मान द्या.
सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही, तो सन्मान द्या. घटक पक्ष आला की हसू नका. मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला आहे.