राष्ट्रवादीच्या नेत्या डाॅ. आशा मिरगेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
डॉ. आशा मिरगे आणि मुलगा अनिमेष पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पारसकर शोरूमच्या तीन कर्मचाऱ्यांनी 18 ऑगस्टला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांचं उपोषणही केलं होतं.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डाॅ. आशा मिरगे यांच्यासह मुलगा अनिमेषवर अकोल्यात गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यातील जुने शहर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी गाडी घेऊन देण्यास टाळाटाळ केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 लाख 93 हजार 899 रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते विवेक पारसकर यांच्या शोरूममधून ही चारचाकी खरेदी करण्यात आली होती. विवेक पारसकर यांच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. विवेक पारसकर हे अकोला पुर्व मतदारसंघातून 2019 मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. अकोल्यात राज्यातील 'महाविकास आघाडी'तील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षांच्या नेत्यांमधील वादाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
डॉ. आशा मिरगे अकोल्यातील कार खरेदी प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. डॉ. आशा मिरगे आणि मुलगा अनिमेष यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी जुने शहर पोलिसांच्या हद्दीत येत असलेल्या खामगाव मार्गावरील पारसकर शोरूममधून हुंडाई कंपनीची ॲसेंट कार खरेदी केली. मुलगा अनिमेषच्या पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून डॉ. मिरगे यांनी ही कार खरेदी केली होती. कारसोबतच 26 हजारांच्या ॲक्सेसरीजही मिरगे यांनी खरेदी केल्याचं पोलीस तक्रारीत नमूद आहे. विवेक पारसकर यांच्याशी ओळख असल्याने मिरगे यांनी बँकेकडून तातडीने कर्ज मंजूर होत नसल्याने सुरूवातीला 101 रुपया देत कार खरेदी करून घेतली. उर्वरित रक्कम 9 धनादेशाद्वारे देण्याचे डॉ. मिरगे यांनी यावेळी कबूल केलं होतं.
मुलगा पुण्याला राहत असल्याने कार पुण्याला नेणार असल्याचे सांगत डॉ. मिरगे यांनी कारची पासिंगही तातडीने करून घेतली. मात्र, पारसकर यांनी पैसे मागितले असता मिरगे यांनी कार खरेदीनंतर सहा महिन्यांनी 2 मार्चला एक लाखांचा धनादेश पारसकर यांना दिला. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास मिरगे यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पारसकर यांनी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यावरून अखेर काल रात्री डॉ. आशा मिरगे आणि मुलगा अनिमेष यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पैसे वसुलीसाठी केलं शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण
डॉ. आशा मिरगे आणि मुलगा अनिमेष पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पारसकर शोरूमच्या तीन कर्मचाऱ्यांनी 18 ऑगस्टला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांचं उपोषणही केलं होतं. पारसकर यांनी अनेक दिवस तक्रारीचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर पोलीसांना डॉ. आशा मिरगे आणि मुलावर गुन्हे दाखल करावे लागलेत.
डॉ. आशा मिरगेंनी आरोप फेटाळलेत
दरम्यान, यासंदर्भातील सर्व आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. आशा मिरगे यांनी फेटाळलेत. आपल्याला राजकारणामुळे खोट्या आरोपांत गोवण्यात आल्याचं त्या म्हणाल्यात. लवकरच सत्यस्थिती समोर आणणार असल्याचं डॉ. आशा मिरगे म्हणाल्यात.