नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार चार वाघ, वन विभागाच्या निर्णयाला स्थानिकांसह वन्यजीवप्रेमींचा विरोध
व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपुरातील ब्रह्मपुरी इथल्या चार वाघांना सोडण्याचा निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला आहे.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसंच वाघांची संख्या वाढवण्यासाठी पहिल्यांदाच दोन नर आणि दोन मादा असे चार वाघ सोडले जाणार असून वन विभाग तयारीला लागला आहे. मात्र वन विभागाच्या या उपक्रमाला गोंदियातील काही वन्यजीव प्रेमींनी विरोध दर्शवला आहे तर काहींनी याला पाठिंबा दिला आहे.
एकीकडे व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी येथील चार वाघांना सोडण्याचा निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून मे महिन्याच्या अखेरीस यातील दोन वाघिणींना या व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे संकेत वन खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही. त्यामुळे इथे चार वाघीण सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आले. या वाघिणी दीड ते दोन वर्षांच्या असून या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजर्यात ठेवून मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडले जाईल. बिलाल हबीब हा संपूर्ण प्रकल्प हाताळत असून स्वयंसेवी संस्थांचीही यासाठी मदत घेतली जात असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. असं असलं तरी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तृण भक्षी प्राण्यांची संख्या कमी असल्याने काही वन्य जीव प्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केला आहे तर काहींनी आनंद व्यक्त केला आहे
तर दुसरीडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून या आधी देखील इथले वाघ दुसरीकडे आणि दुसरीकडील वाघ या व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर झाले आहेत. असं असताना या ठिकाणी नव्याने का वाघ आणत आहे, असा प्रश्न स्थानिक वन्य जीव प्रेमींना पडला आहे. या संदर्भात वन विभाग कॅमेऱ्यासमोर बोलायला मात्र तयार नाही त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघांना कधी आणून सोडतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.