(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स, अडसूळ-राणांचे एकमेकांवर गंभीर आरोप
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Shiv Sena Ex MP Anandrao Adsul) यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. मात्र अडसूळ दिल्लीला जाणार असल्यानं हजर राहाणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे. City Co-Op बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. नवनीत राणांच्या तारखेवेळी नेहमीच समन्स पाठवलं जातं असा आरोप आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी केला आहे. आम्ही सर्व चौकशीला जायला तयार, पण नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या केसचा निकालही निपक्षपाती व्हायला हवा, अशी मागणीही अभिजीत अडसूळ यांनी केली.
काय म्हणाले आनंदराव अडसूळ
आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, जे आरोप लावले आहेत त्या ऑडिट प्रकरणात मी, माझा मुलगा यांचा काही संबंध नाही. सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांनी मला समन्स दिले. त्यांना मी सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. मी याआधीच ईडी कार्यालयात जाऊन आलो आहे. रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या केसची सुनावणी आली की मला ईडीकडून समन्स पाठवण्यात येतं. रवी राणा यांनी हे सर्व मॅनेज केलं आहे. त्यांचं सरकार वर आहे, असा आरोपही आनंद अडसूळ यांनी केला. खातेदार, ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंघाने बॅंकेतील काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. मात्र बँकेचा टर्नओव्हर 800 कोटींचा असताना 900 कोटींचा घोटाळा कसा होईल असंही अडसूळ म्हणाले.
एबीपी माझाशी बोलताना अभिजित अडसूळ म्हणाले की, खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाची तारीख असली की दरवेळी असे उपद्व्याप सुरू असतात. बँकेत गैरव्यवहाराबाबत अगोदर आम्हीच तक्रार केली आहे.लक्ष विचलित करण्यासाठी ईडी चौकशीचा हा फार्स आहे, असं अभिजित अडसूळ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.
काय म्हणाले रवी राणा
दरम्यान आमदार रवी राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, मुंबई येथील City Co- Operative Bank बँकेत माजी खासदार अडसूळ यांनी 900 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीकडे आपण स्वत: तक्रार केली होती. त्याअनुषंगाने ईडीने कारवाई केली आहे. ठेवीदार, खातेदारांच्या श्रमाची रक्कम बळकावण्याचा हा प्रकार आहे, असं राणा म्हणाले.
काय आहेत आरोप
मुंबई येथील City Co- Operative बँकेत 900 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने हे समन्स बजावलं असल्याची माहिती आहे.आनंदराव अडसूळ यांनी City Co- Operative Bank बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. ईडीने याआधी अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली.