(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare Letter : 'महाराज आम्हाला माफ करा'; शिवजयंतीनिमित्त सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र, काय लिहलंय पत्रात?
Sushma Andhare Letter : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भावनिक पत्र लिहत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Sushma Andhare Letter : शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने महोत्सवाचे आयोजन केलं असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भावनिक पत्र लिहत विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. तर 'फितुरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जात' असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र!
आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,
आम्हाला माफ करा..
आज तुमच्या जन्मदिनी,
स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..
तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय,
असे कधीही घडले नाही...
पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,
असे वचन आम्ही तुम्हाला देतो..
शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच,
फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या!
स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या!
आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!
हर हर महादेव !!
तुमचा खरा मावळा,
सच्चा शिवसैनिक.
ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल : एकनाथ शिंदे
शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव दरम्यान बोलताना, ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आमचे सरकार सर्व सामान्यांचे सरकार असून, या सरकारने सगळे निर्णय राज्यातील लोकांच्या हिताचे, कष्टकऱ्यांच्या हिताचे घेतले आहेत. सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत जे-जे आपल्याला करायचे आहे, ते-ते आपण करुयात असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवरांयाचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम सरकार करणार असून, यामध्ये सरकार कुठेही हात आखडता घेणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती झाले आक्रमक
शिवनेरी गडावर गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याचे पाहायला मिळालं, त्यामुळे संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी संतप्त शिवभक्तांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केल्या. व्हीआयपी (VIP) लोकांसाठी शिवभक्तांच्या अडवणूक कशासाठी करता? अशी थेट विचारणा त्यांनी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या भावना समजावून घेत, आपल्या भावनांशी आम्ही एकरूप असल्याचं म्हटलं. आम्ही तुमच्या भावनांची दखल घेतली आहे. राज्यातील गडकोट संवर्धन करण्याचं काम सरकारकडून नक्की केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.