Maharashtra Rain Update: कुठे विश्रांती तर कुठे मुसळधार! नगरमध्ये पुरस्थिती, बीडमध्ये शाळांना सुट्टी, जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती
Maharashtra Rain Update: राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही भागात अद्याप मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.
Maharashtra Rain Update: राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही भागात अद्याप मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागामध्ये अद्याप मुसधार पाऊस सुरू आहे. अहमदनगरच्या जामखेड परिसरात आज पहाटे मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपले. या पावसामुळे साकत परिसरातील अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. बीड मधील पाटोदा शहर परिसरामध्ये तीन ते चार तास जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर अकोट तालूक्यातील मोहाळा भागात आलेल्या पाऊस आणि पुरामुळे (Heavy Rain) अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जेसीबीच्या मदतीने लोकांना बाहेर काढलं
अहमदनगरच्या जामखेड परिसरात आज पहाटे मुसळधार (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली. पावसामुळे साकत परिसरातील अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे अनेक लोकांचा संपर्क तुटला होता. आज सकाळी काही लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच या पाण्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील घरी परत जावे लागले. शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाटोद्यात जोरदार पाऊस; मांजरा नदीला पूर, शहरातील शाळांना आज सुट्टी..
काल (शुक्रवारी) रात्री बीडच्या पाटोदा शहर परिसरामध्ये तीन ते चार तासाचा जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. याच पावसामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. हीच मांजरा नदी पाटोदा शहरातून जाते. म्हणून पाटोदा शहरातील शाळा, कॉलेज यांना आज प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यात फक्त पाटोदा परिसरातच काल (शुक्रवारी) जोरदार पावसाने हजेरी लावली. एकाच पावसात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मांजरा नदीचा उगम याच पाटोदा तालुक्यात होतो आणि नदीच्या उगम परिसरातच जोरदार झालेल्या पावसामुळे सध्या मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
आज कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता?
मुंबईत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस (Rain Update) पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांसाठी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संबधित बातम्या - Weather Update : मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट