Pune Crime News : पुण्यात सापडलेल्या अतिरेक्यांकडे ड्रोन कॅमेरे, नेमकं कशाचं केलंय चित्रीकरण?
पुण्यात दहशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी या दोन दहशतवाद्यांकडून ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य जप्त केले आहे
Pune Crime News : पुण्यात दहशविरोधी कृत्याच्या (Pune Crime News ) संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी या दोन दहशतवाद्यांकडून ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य जप्त केले आहे. त्यासोबतच चार किलो केमिकल पावडर जप्त करण्यात आले आहेत. विध्वंसक कारवायांसाठी हे पावडर वापरलं जातं, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे
‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24 वर्षे), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळलं आहे. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे दोघं 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचं साहित्य जप्त केलं आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंदेखील समोर आलं आहे. या चित्रीकरणात नेमकं काय आहे? पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केलं आहे आणि यात पुण्यातील बाहेरचं चित्रीकरण केलं आहे का?, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत.
दुचकीच्या ब्लास्ट करायचा होता?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघं दहशतवादी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी राहत्या परिसरातून दुचकी चोरण्याचा प्रयत्न केला नाही. जेणेकरुन पकडले गेल्यास स्थानिक पोलिसांच्या नजरेत येणार नाही. यामुळे त्यांनी राहत्या परिसरापासून लांबचा परिसर चोरीसाठी निवडला होता. काही वर्षांपूर्वी पुण्यात चोरीच्या गाड्यांचा ब्लास्ट करण्यात आला होता. त्यांनाही दुचाकीचा ब्लास्ट करायचा होता असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
NIA, ATS पथकांकडून तपास सुरु
पुणे पोलिसांनी या दहशतवाद्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडे कसून चौकशी सुरु आहे. केंद्रातील तपास यंत्रणा ही तपासासाठी आता पुण्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान या दोघांना पकडल्यानंतर एनआयए दिल्ली, मुंबई, जयपूरची पथके आणि महाराष्ट्र एटीएसचे पथक दाखल झाले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला आहे.