Latur: उदगीर सामान्य रुग्णालयातील घृणास्पद प्रकार, तपासणीच्या नावाखाली महिला रुग्णांचा विनयभंग, गुन्हा दाखल
Latur: सरकारी रुग्णालयातील या प्रकारामुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
Latur: उदगीरच्या उप जिल्हा रुग्णालयातील (Udgir Sub District Hospital) तपासणीच्या नावाखाली प्रसूती कक्षातील महिला रुग्णांचा विनयभंग (Molestation) केला जात असल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येत रुग्ण येत असतात. या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचीही संख्या खूप आहे. मात्र, या रुग्णालयात तपासणीच्या नावाखाली प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्णांचा विनयभंग होत असल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी सचिन राजमाने नावाच्या ब्रदरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन प्रसूती झालेल्या महिलांना तपासणीच्या नावाखाली प्रसूती वार्डच्या बाजूच्या रुममध्ये एकटला बोलावून त्यांचा विनयभंग करायचा.
दरम्यान, एका महिला रुग्णांसोबतही असाच प्रकार घडलाय. याबाबत संबंधित महिलेनं तिच्या नातेवाईकांना माहिती दिलीय. नाव माहिती नसल्यामुळं या महिलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा फोटो दाखवण्यात आलाय. त्यानंतर सचिन राजमाने नावाच्या ब्रदर चे हे कृत्य असल्याचं उघड झालंय. याप्रकरणी पीडिताच्या नातेवाईकांनी दोषी कर्मचाऱ्याविरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्यानं पीडिताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
या सर्व प्रकारची कुणकुण लागल्यामुळं आरोपी सचिन राजमाने हा पळून गेलाय. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. सदरील घटनेची रुग्णालयात चर्चा झाल्यानंतर आणखीन एका महिलेनं त्याच्याबाबत अशीच तक्रार दिली आहे. दोन महिलांनी हिम्मत करत स्वत:वरील अत्याचाराबाबत तक्रार केली. यापूर्वी ही त्यानं असे किती प्रकार केले असावेत असा प्रश्न आता निर्माण झालाय? सरकारी रुग्णालयातील या प्रकारामुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha