(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmers News : भूसंपादन न करताच पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचं काम सुरु, अद्याप मोबदला मिळाला नाही, शेतकऱ्यांचा आरोप
Farmers News : भूसंपादन न करताच पैठण-पंढरपूर पालखी महामार्गाचं काम सुरु असून, अद्याप मोबदला मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Farmers News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 2017 पैठण-पंढरपूर (Paithan-Pandharpur Highway) या संत एकनाथ महाराज पालखी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ता हस्तांतरीत झाला. पैठण ते खर्डा एन. एच. 752 ई या रस्त्याच्या निविदा निघाल्या, पण प्रत्यक्षात या रस्त्याचे भूसंपादन अधुरे असतानाच या रस्त्याचे काम सुरू झालं. अनेक शेतकऱ्यांना तर त्यांच्या जमिनीचा मोबदला न देताच त्यांच्या शेतातून रस्त्याचं काम सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
भूसंपादन न करताच रस्त्याचं काम सुरु
पैठण-पंढरपूर पालखी मार्गाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. या रस्त्याचं काम देखील जोरात सुरु झालं. पण शेवगाव तालुक्यातील मुंगी, बोधेगाव, हातगाव या गावात या रस्त्यासाठी भूसंपादन न करताच काम सुरु केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता असताना तो 3.75 मीटर होता. मात्र, भूसंपादन न करता या महामार्गाचे 16 मीटरचे काम सुरु असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी कधी पैशाचे आमिष दाखवून तर कधी पोलिसांचा आणि कायद्याचा धाक दाखवून रस्त्याचे काम सुरु ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. रस्त्याच्या कामाला विरोध नाही मात्र, आम्हाला मोबदला तरी द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
काही ठिकाणी रस्त्याला तडे
आतापर्यंत या रस्त्याचा तीन वेळा डीपीआर बदलण्यात आल्याचे हातगांव ग्रामपंचायतचे सदस्य डॉ. निलेश मंत्री यांचं म्हणणं आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता देखील चांगली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात विजेचे खांब आहेत, काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही एकदा ट्विट करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान रस्ता व्हावा, विकास व्हावा पण यात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पैठण-पंढरपूर पालखी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असताना अनेक ठिकाणी धोकादायक वळण तशीच ठेवण्यात आली आहेत. शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Eknath Shinde: समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी टप्पा कधी सुरू होणार? CM शिंदे यांनी स्पष्टच सांगितले