कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती.
हिंगोली : राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून आता सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. तर, दुसरीकडे शेतकरी (Farmer) आता पेरणीच्या कामात व्यस्त होणार असून पहिल्या पावसानंतर पेरणीला सुरुवातही होईल. त्यामुळे, बियाणांची खरेदी करण्यासाठी बळीराजा बी-बीयाणं , खतांच्या दुकानात पाहायला मिळत आहे. मात्र, बियाणांची वाढलेली किंमत पाहून शेतकरी निराश झाल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांत मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत ठरलेला सोयाबीन (Soyabin) शेतकऱ्यांचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे, शेतकऱ्यांनी शेतामध्ये चांगल्या पद्धतीने सोयाबीनचे उत्पादन घेतले होते, परंतु बाजार भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतामधलं सोयाबीन घरीच ठेवलं होतं. वर्षभर सोयाबीनचा भाव पाच हजारांच्या पुढे कधीच गेला नाही, सध्या हे सोयाबीन चार ते साडेचार रुपये दराने विक्री होत आहे, आता पेरणीची वेळ आली तरही सोयाबीनचा भाव वाढला नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तर, नव्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाने चांगलाच भाव खाल्ल्याचं दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी शेतामध्ये मशागतीची कामे पूर्ण करून ठेवली आहेत आणि पावसाची वेळ जवळ आल्याने बाजारामध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु सोयाबीनच्या बियाण्याचे भाव प्रचंड वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या सोयाबीनला 4 हजार रुपये पर क्विंटल भाव मिळतोय, तर सोयाबीनचे बियाणे सात ते दहा हजार रुपये पर क्विंटल दराने खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे बियाण्याचे भाव वाढल्याने शेतात सोयाबीनची पेरणी कशी करायची असाच प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे.
सोयाबिन पेरणीची पद्धत
सोयाबीनसाठी वापरला जाणारा बियाणे दर हा राखल्या जाणाऱ्या अंतरानुसार सरासरी 16 किग्रॅ – 20 किग्रॅ/एकर असतो. दोन रांगांतील अंतर: 45 ते 60 सेमी तर रोपांतील अंतर: 4-5 सेमी एवढे ठेवण्यात येते. सोयाबीनला चांगला गादीवाफा लागतो ज्याचा पोत बऱ्यापैकी चांगला असेल आणि त्यामध्ये खूप जास्त ढेकळे नसतील. जमीन योग्य सपाट केलेली आणि पेंढा नसलेली असावी. कुळवाच्या नांगराने एकदा खोल नांगरणी करून त्यानंतर स्थानिक नांगराने दोनदा कुळवणी किंवा दोनदा नांगरणी पुरेशी असते. पेरणीच्यावेळी मातीमध्ये चांगला ओलावा असावा लागतो.
वालुकामय चिकणमाती चांगली
सोयाबीनची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. सोयाबीनच्या जातींमध्ये दिवसांची लांबी हा प्रमुख घटक आहे. कारण या कमी दिवसांच्या वनस्पती आहेत. सोयाबीनला चांगला निचरा असलेली सुपीक जमीन लागते जिचा सामू मात्रा 6.0 – 7.5 असेल. मातीचा उत्तम प्रकार म्हणजे वालुकामय चिकणमाती, जिच्यामध्ये सेंद्रिय घटक चांगले असतील. पाणी साठून राहणारी माती सोयाबीन लागवडीसाठी अनुरूप नाही.