Fake Milk Production : तेल आणि पावडरपासून बनावट दूध निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई, तीन जणांना अटक
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात तेल आणि पावडरचा उपयोग करुन बनावट दुधाची निर्मिती केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
Fake Milk Production : तेल आणि पावडरचा उपयोग करुन बनावट दूध बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात बीडगावजवळ एका शेत शिवरात हा उद्योग केला जात होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात भेसळीचे दूध वापरले जात असल्याच्या अनेक दिवसपासून चर्चा सुरु होत्या. मात्र, कोणतीही ठोस घटना समोर येत नव्हती. त्यामुळे या चर्चा केवळ चर्चाच राहिल्या होत्या.
मात्र, या सर्व चर्चा खऱ्या असल्याचं जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बिडगाव परिसरात पोलिसांनी घातलेल्या छापेमारीमधून समोर आलं आहे.
दरम्यान, पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाला रिफाइंड तेल आणि पावडरचा उपयोग करुन चोपडा तालुक्यातील बीड गावच्या भागात एका शेत शिवारात बनावट दूध बनविले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर काल रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली. यावेळी काही व्यक्ती या बनावट दूध निर्मिती करीत असल्याचं समोर दिसून आलं.
यावेळी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागानं एकत्रित कारवाई करत तब्बल 11 लाखांचे साहित्य यावेळी जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दूध ही प्रत्येकाच्या घराची गरज आहे. सर्वांसाठी गरजेच्या आणि मोठी मागणी असलेल्या दुधात भेसळही केली जाते. भेसळयुक्त दूध खाल्ल्यानं किंवा तेल आणि पावडरपासून तयार केलेल्या दुधामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना बळी पडू शकतो. त्यामुळं खरे आणि भेसळयुक्त दूध ओळखता येणं महत्त्वाचं आहे. दुधात पाणी घालण्यासोबतच 10 पेक्षा जास्त वेगवेगळ्या गोष्टी मिसळून सिंथेटिक दूध तयार केलं जातं.
महत्त्वाच्या बातम्या: