(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुष्काळी गाव म्हणून जिथं लग्नासाठी मुली देण्यासही नकार दिला जायचा! असं दुष्काळी हिंगणगाव झालं पाणीदार
Ahmednagar Hingangaon village story सिंचन आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्याने काही वर्षांपूर्वी गावातील युवकांना सोयरीक देखील मिळत नव्हती, मात्र आता गावाची वाटचाल बागायती गावाकडे सुरू आहे.
अहमदनगर : पाणीटंचाई आणि दुष्काळी गाव म्हणून अहमदनगरच्या हिंगणगावात लग्नासाठी मुली देण्यासही नकार दिला जायचा. दुष्काळ जणू पाचविलाच पुजलेला, अशीच काहीशी अवस्था हिंगणगावची होती. मात्र, इथल्या नागरिकांनी लोकसहभाग, सरकारी निधीतून गाव पाणीदार केलंय. जिथे पिण्याच्या पाण्याची वानवा होती, त्या गावशिवारात तब्बल तीनशे एकर उसाची लागवड करण्यात आली आहे.
अहमदनगरपासून पंधरा किमी अंतरावर वसलेलं हिंगणगाव. खरं तर काही वर्षांपूर्वी हिंगणगाव हे दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जायचं. उन्हाळ्यातच काय तर बाराही महिने या गावात पिण्याच्या पाण्याची वाणवा असायची. जिथे हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागायची तिथे शेती सिंचनाचा विषय दुरच. हीच गोष्ट लक्षात घेऊन गावकऱ्यांनी लोकसहभागातून आणि सरकारी निधीतून जलसंधारणाचे काम हाती घेतले.. उंबरनाला आणि जामगाव नाला या दोन ओढ्यांवर सुरुवातीला एक बंधारा बांधला. त्याचा परिणाम जाणवू लागल्याने ग्रामस्थांनी तब्बल अकरा बंधारे बांधले.
बंधारे बांधल्याने गावच्या पाणीपातळीत वाढ झाली, त्यामुळे पीकपद्धतीत बदल झाला. जिरायती शिवार बागायती झालं. दरवर्षी उन्हाळ्यात सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या हिंगणगावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट व्हायची, गावातील युवकांना दूरवरून ड्रमने पाणी आणावं लागायचं, मात्र, पाणी टंचाई दूर झाल्याने गावाच्या महिलांनीही समाधान व्यक्त केलंय.
सिंचन आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता नसल्याने काही वर्षांपूर्वी गावातील युवकांना सोयरीक देखील मिळत नव्हती, मात्र आता गावाची वाटचाल बागायती गावाकडे सुरू आहे.
जिल्हा परिषद आणि अन्य निधीतून अकरा बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली. जवळपास एक कोटी रुपयांच्या जलसंधारणाची कामे गावात झाली. बंधाऱ्यातील साठलेला गाळ काढण्यात आला. ओढ्याचे खोलीकरण, बांधऱ्यांची दुरुस्ती, नवीन बंधाऱ्यांची कामे झाली. परिणामी गावशिवार पाणीदार होऊ लागला. पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी टँकरची वाट पाहावी लागणाऱ्या हिंगणगावात आता पाणीपातळीत कमालीची वाढ झालीये. हिंगणगावात सुमारे 770 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील साधारण चाळीस हेक्टर क्षेत्र पडीक होत आता या पडीक क्षेत्राचाही सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. भर उन्हाळ्यातही या बंधाऱ्यामध्ये पाणी दिसत आहे.