Onion Prices Fall : कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी, लहरी वातावरणामुळं उत्पन्नातही घट
सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. त्यातच पुन्हा शेतमालाला दर मिळत नसल्याचे शेतकरी अडचणीत आहे.
Onion Prices Fall : अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्यांच्या लागवडी झाल्या आहेत. मागील नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवडी झालेल्या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर नांगर फिरवला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं कांदा लागवड केली होती. त्यातच मजूर टंचाई, विजेच्या लपंडाव, रासायनिक खते व औषधांचा वाढता खर्च अशा सर्व अडचणींवर मात करत शेतकर्यांनी आपला कांदा आणला. पण, सध्या त्याच्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं कांद्यानं शेतकर्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणल्याची स्थिती आहे.
आधीच राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. अशातच त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यावर दुहेर संकट येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असते. मात्र, सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला असला तरी या अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकर्यांचा खर्च देखील निघणार नाही, असे चित्र दिसत आहे.
सुरुवातीच्या कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपयांचा जागेवर भाव मिळाला. मात्र, सध्या कांद्याला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे. परिसरात अजूनही बराच कांदा काढणीचा बाकी आहे. एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्यांचा कांदा काढून होईल असा अंदाज आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सर्व कांदा काढून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल, त्यामुळं भावात अजून मोठी घसरण होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या धास्तावल्याचे चित्र दिसत आहे.
लहरी वातावरणामुळे कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट
दरवर्षी साधारण मला एकरी उत्पन्न अठरा ते एकोणीस टनापर्यंत मिळते. मात्र, लहरी वातावरणामुळं यंदा कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट झाली आहे. त्यातच भरमसाठ खर्च झाल्यानं खर्च देखील निघणार नाही अशी अवस्था आहे. बाजार समितीत जरी कांद्याला 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपयांचा दर मिळत असला तरी जागेवर कांद्याला 700 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे. त्यातच उत्पन्न घटल्याने खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकरी विजय पटारे यांनी म्हटले आहे.