(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाळासाहेब थोरात यांच्या कन्येच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट सुरु करुन पैशांची मागणी, पोलिसात तक्रार दाखल
अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. त्यावरुन पैशाची मागणी केली जात होती.
शिर्डी : काँग्रेस नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. फेसबुकचे बनावट खाते उघडून गुगल पे, फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली जात असल्याचं समोर आला आहे. या प्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे बनावट खाते बंद करुन खोडसाळपणा करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. 1 ते 2 मार्चच्या कालावधीत रात्री दहाच्या सुमारास या बनावट खात्याद्वारे काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली. फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. हे खाते त्वरित बंद करुन तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी अर्जाची तात्काळ दखल घेत बनावट फेसबुक अकाउंट बंद केले असून चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बनावट खाती उघडून पैसे उकाळणार्या टोळीचे हे काम असल्याच्या संशय व्यक्त केला जातो. मात्र, थेट महसूल मंत्र्यांच्या मुलीच्या नावाने असे बनावट खाते तयार करुन पैसे उकळण्याचा प्रकार घडला असल्याने त्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
जयश्री थोरात यांची फेसबुक पोस्ट
जयश्री थोरात यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, 'हे माझे अधिकृत फेसबुक अकाऊंट आहे. इतर कोणत्याही फेसबुक अकाऊंटशी माझा संबंध नाही. तरी एकविरा फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमांबद्दलची माहिती मी या फेसबुक अकाऊंटवरुन आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. तरी इतर माझ्या फेक अकाऊंटची पोलीस खात्याकडे तक्रार दाखल केली आहे.