समित कदमांची नार्को चाचणी करा! शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्यांची मागणी, म्हणाले...
न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने त्यांचा अहवाल यापूर्वीच सरकारला सादर केलाय. तरीही सरकार तो अहवाल विधानसभेच्या पटलावर आणत नाही, ही गंभीर बाब असल्याची टीका शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलीय.
Maharashtra Politics मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत खळबळाजनक खुलासा केला आहे. आम्ही तुम्हाला सर्व आरोपातून दोष मुक्त करू, पण तुम्हाला उद्धव ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खोटे प्रतिज्ञापत्र बनवून द्यावे लागतील, अशा प्रकारची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम (Samit Kadam) यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना केली, असा गौप्यस्फोट नुकताच अनिल देशमुख यांनी केलाय. अनिल देशमुख यांच्या गौप्य स्फोटाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने घेतल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी माध्यमांना दिली.
समित कदमांची नार्को चाचणी करण्याची मागणी
राजकारण आणि सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष किती खालची पातळी गाठू शकतं, याचे हे उदाहरण असल्याचे महेश तपासे म्हणाले. शिवसेना फोडण्याचं श्रेय याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांना स्वतःच्या सरकारमध्ये सामील करत भाजपने महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही नामशेष करण्याचा डाव आखला. परंतु मायबाप जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा त्यांना दाखवली, असा टोला ही महेश तपासे यांनी लगावला. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या खोट्या आरोपाचा आधार घेत भारतीय जनता पक्षाने अनिल देशमुख यांना टार्गेट केले होते. तत्कालीन ठाकरे सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती.
न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने त्यांचा अहवाल यापूर्वीच सरकारला सादर केलाय. तरीही सरकार सदरचा अहवाल विधानसभेच्या पटलावर आणत नाही, ही गंभीर बाब आहे. शिवाय यातून शुद्ध राजकीय हेतू समोर येतोय, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
न्यायमूर्ती चांदीवर आयोगाचा अहवाल सरकार का जाहीर करीत नाही? याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, अशी मागणीही महेश तपासे यांनी केलीय. समित कदम कोण आहे? त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध काय? कुठल्या कारणास्तव समित कदम याला वाय दर्जाची सुरक्षा देवेंद्र फडणवीस यांनी दिली, याचा खुलासा राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केलीय. सत्याता जाणून घ्यायचीच असेल तर समित कदम या इसमाची नार्को चाचणी करण्याची मागणीही महेश तपासे यांनी यावेळी केली. हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर असून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. यावर स्पष्टता येणे गरजेचे असल्याचेही तपासे यांनी म्हटले.
हे ही वाचा