गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट; महिला वाहकाच्या हाताला दुखापत
गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट झाल्याने महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे.
गोंदिया : गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट झाला आहे. या अपघातात एका महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या मशीन संदर्भात अनेक तक्रारी होत असताना आता त्यातच ही गंभीर घटना घडल्याने वाहकांमध्ये भीती पसरली आहे. या मशीनमुळे वाहकासोबत प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तिकीट वेंडिंग मशीन दिसायला छोटे आणि साधे वाटत असले तरी पण वाहक आणि प्रवाश्यांसाठी धोकायदायक झाले आहे. कारण गोंदियात एका महिला वाहकासाठी हा बॉम्ब ठरला आहे. ह्या वेंडिंग मशीनचा ब्लास्ट होऊन महिला वाहकाला दुखापत झाली आहे. कल्पना मेश्राम असे जखमी झालेल्या वाहकाचे नाव आहे. कल्पनाच्या हातातले तिकीट वेंडिंग मशीन अचानक फुटले. या घटनेला तीन दिवस उलटले असूनही आजही कल्पना ही घटना विसरू शकत नाहीये.
ह्या मशीन वाहकांना दिल्या तर जात आहेत. पण ह्या किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. कारण, ह्याआधीही असे ब्लास्ट झाले आहेत. बॅटरी ओव्हर हिट झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता मशीन तयार करणाऱ्या ट्रायमॅक्स नावाच्या कंपनीचा सर्व्हिस इंजिनियर खोजेंद्र शिवहरे यांनी वर्तवली आहे.
यापूर्वीच्या मशीनच्या तक्रारी कुठल्या
- कीबोर्ड काम न करणे
- तिकिटांची रक्कम मशीनमध्ये दाखवणे पण तिकीट चुकीचे छापून येणे.
- वारंवार हँग होणे
- आधीही ब्लास्ट झाले आहेत.
कल्पना मेश्रामच्या ह्या घटनेनंतर सर्वांमध्येच एक भीतीचे वातावरण आहे. वाहक किंवा ग्राहक कोणालाही धोका होऊ शकतो. या संदर्भात अनेकांनी महामंडळात तक्रारी दिल्या आहेत. ह्या एकाच ट्रायमॅक्स नावाच्या कंपनीने साल 2017 ला ह्या मशीन पुरावल्याचे कळते. महाराष्ट्रात 38 हजार मशीनपैकी तब्बल 10 हजार मशीन बंद आहेत. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळ प्रशासन याची दखल घेणार का? की वाहक आणि प्रवास यांना जीवावर टांगती तलवार घेऊनच प्रवास करावा लागणार असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.