Ambadas Danve : अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! छत्रपती शिवराय अन् संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा तो फोटो शेअर करत अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Ambadas Danve : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा आता प्रशांत कोरटकरचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचा फोटो शेअर करत बोचरी टीका केली आहे.

Ambadas Danve : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फरार प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा, या मागणीचा अर्ज सरकारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात!
दरम्यान, अबू आझमींवर कारवाई संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत कोरटकर चिल्लर असल्याचे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत मराठी भाषेवरून बोलणाऱ्या भैय्याजी जोशी यांना उद्धव ठाकरे यांनी कोरटकरप्रमाणे भैय्याजी जोशी चिल्लर असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा आता प्रशांत कोरटकरचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचा फोटो शेअर करत बोचरी टीका केली आहे. अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! अशा शब्दात तोफ डागली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रशांत कोरटकर अमित शाहांना हस्तांदोलन करताना दिसून येत आहे.
अश्या 'चिल्लर' लोकांना शाह पण भेटतात! pic.twitter.com/D9CEiCZri1
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 7, 2025
दरम्यान, कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कोरटकर गायब झाला आहे. त्याच्या अटकेसाठी दोन पथके नागपूरला गेली होती. मात्र, त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळवला. त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी जिल्हा पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी संपर्क साधून सरकारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळवली. त्यानुसार गुरुवारी दुपारपर्यंत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
काही लोकांना राजकारण करायचं आहे
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर प्रकरणात इंडिया आघाडीकडून राजकारण करण्यात येत आहे. या प्रकारात पोलिसांनी तत्काळ कोरटकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पोलिसांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून रद्द करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण काही लोकांना यावरून राजकारण करायचं आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (6 मार्च) कोल्हापूर दौऱ्यात केली. ते म्हणाले की प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी उच्च न्यायालयात मागणी केली आहे. सेशन कोर्टाने कोरटकरला दिलेला दिलासा काढून टाकण्याची मागणी केली आहे, पण तरीही काहींना यात राजकारण करायचं आहे त्यांना ते करू देत.
दुसरीकडे मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने कोल्हापूरमध्ये काल इंडिया आघाडीसह शिवप्रेमी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. काल पहाटेपासूनच घरात दाखल होत पन्नासहून अधिक जणांना ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्याचा पवित्रा आंदोलकांचा होता. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांसोबत सुरू असलेल्या बैठकांना यश आले नव्हते. त्यामुळे प्रतिसाद मिळत असल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
इतर महत्वाच्या बातम्या
























