(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापूर एनटीपीसीत निर्माण होणाऱ्या वीजेचे दर झाले कमी, वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याची माहिती
लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक कंपन्या बंद होत्या, त्यामुळे वीजेची मागणी घटली होती. मात्र अनलॉक होत असताना वाढत्या मागणीमुळे सोलापूर एनटीपीसी प्लान्टमधील दोन्ही युनिट पुर्ण क्षमतेने सुरू
सोलापूर : वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीत कपात झाल्याने उत्पादन खर्च कमी झाला. बचत झाल्याने कमी दरात वीज पुरवठा करण्यात यश आले त्यामुळे मागणीतही वाढ झाल्याची माहिती सोलापूर एनटीपीसीचे सरव्यवस्थापक नामदेव उप्पार यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक कंपन्या बंद होत्या, त्यामुळे वीजेची मागणी घटली होती. मात्र अनलॉक होत असताना वाढत्या मागणीमुळे सोलापूर एनटीपीसी प्लान्टमधील दोन्ही युनिट पुर्ण क्षमतेने सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर 23 आणि 40 मेगावॅट अशा दोन सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना असल्याचेही त्यांनी जाहीर केले. आधी एनटीपीसीच्या सोलापूर प्रकल्पात दीड हजार किलोमीटर दूर असलेल्या ओडीसा राज्यातून कोळसा आणला जात होता. मात्र आता तेलंगणाच्या सिंगरेनी येथील कोळसा मिळू लागला आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली. परिणामी तीन रूपये 80 पैशांनी उत्पादित होत असलेल्या विजेचा उत्पादन खर्च एक रूपयाने कमी झाला आहे. आता 2 रूपये 80 पैसे प्रति युनीट दराने वीजेची विक्री केली जात असल्याची माहिती नामदेव उप्पार यांनी दिली. वीजदर कमी झाल्याने जुलैपासून तब्बल 80 कोटी युनीटची विक्री झाली आहे. दिवाळीत ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पर्यावरणाच्या दृष्टीने देखील एनटीपीसी विचार करत असून आगामी काळात 23 आणि 40 मेगावॅटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प, वीज निमिर्ती करण्यावेळी सल्फर डाय ऑक्साई़डची मात्रा कमी करण्यासाठी एफजीडी प्रणालीची अवलंब केला जाणार असल्याची माहिती देखील एनटीपीसी सोलापूरचे सरव्यवस्थापक नामदेव उप्पार यांनी दिली.