Belgaum Lok Sabha by-election | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत 54.02 टक्के मतदान
बेळगाव लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून येऊन केंद्रात राज्य रेल्वे मंत्रिपद भूषावल्लेले सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक पार पडली.
बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 54.02 टक्के इतके मतदान झाले आहे. एकूण 9लाख 79 हजार 693 इतक्या मतदारांनी लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. उन्हाचा तडाखा, पोटनिवडणुकीबाबत असलेला जनतेचा निरुत्साह, कोरोनाचे सावट या बाबींमुळे लोकसभा पोटनिवडणुकीतील मतदानाचा टक्का घसरला आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला असून सकाळी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली नाही. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांनी आपल्या दोन्ही मुलींसमवेत सदाशिव नगर येथील मतदान केंद्रात मतदान केले. आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या नाहीत.
सर्वाच पक्षांचे कार्यकर्ते मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदानासाठी बोलावून आणत होते. सकाळी 11 वाजता 13.13 टक्के, 12 वाजता 22.49 टक्के,दुपारी 1 वाजता 25.13 टक्के, दुपारी 3 वाजता 35.55 टक्के, 5 वाजता 46.70 टक्के मतदान झाले होते.
बेळगावमध्ये कोण मारेल बाजी?
बेळगाव लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून येऊन केंद्रात राज्य रेल्वे मंत्रिपद भूषावल्लेले सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक पार पडली. भाजपमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपने अखेर दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी घोषित केली.
काँग्रेसने देखील आमदार सतीश जारकीहोळी यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले. महाराष्ट्र एकीकरण समितीने तरुण उमेदवार शुभम शेळके यांना उमेदवारी देवून पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षासमोर आव्हान उभे केले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मराठी भाषिक एकत्र आले आणि त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रॅली काढून आणि जाहीर सभा घेऊन मराठी भाषिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले.समिती उमेदवार शुभम शेळके यांना जनतेने लोकवर्गणी काढून प्रचाराला मदत केली. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील समितीच्या उमेदवारासाठी झंझावाती प्रचार केला. भाजप हाय कमांडने तर ही लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे अर्धे मंत्रीमंडळ प्रचारात गुंतले होते.