श्रीकांत शिंदे की निहार ठाकरे; एकनाथ शिंदेंचा युवा सरसेनापती कोण?
shivsena : शिंदे गटातल्या आमदारांच्या मुलांना संधी मिळेल का? की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गळ्यात युवा सेना प्रमुख पदाची माळ घातली जाणार ? याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत.
Eknath Shinde shivsena : शिवसेनेतून बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणच मूळ शिवसेना असून आपली विविध कार्यकरिंणी घोषित करत आहेत. युवा सेनेची कार्यकरिंणी नुकतीच घोषित करण्यात आली. पण शिंदे गटाचं युवा सेना प्रमुख पद कोणाकडे जाणार? याचीच जास्त चर्चा सुरु आहे. याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. याबाबत जाणून घेऊया...
शिंदेचा युवा सेना प्रमुख कोण?
श्रीकांत शिंदे, पुर्वेश सरनाईक, निहार ठाकरे की शिंदे गटातल्या आमदारांच्या मुलांना संधी मिळेल का? की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गळ्यात युवा सेना प्रमुख पदाची माळ घातली जाणार ? याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत.
शिंदे गटाकडून कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. या कार्यकरिणीत जवळपास शिंदे गटातल्या आमदारांच्या मुलांवर जबाबदारी देण्यात आली आहे. पण मुख्य पद जे आहे ते कोणाकडे जाणार याची उत्सुकत सर्वांनाच आहे. कारण ज्या कुणाच्या गळ्यात युवा सेनाप्रमुख पदाची माळ पडेल त्याचा थेट सामना आदित्य ठाकरेंशी होणार आहे. त्यामुळे हे पद शिंदे गटासाठी खूप महत्वाचं मानलं जातंय जोपर्यंत हे पद जाहिर होत नाही तोपर्यंत शिंदे गटाची युवा सेनेची कार्यकरिणी पुर्ण होणार नाही.
या पदासाठी सुरुवातीला खासदार श्रीकांत शिंदेंच्याच नावाची चर्चा होती. पण श्रीकांत शिंदेंनी आपण हे पद स्वतःकडे ठेवणार नसल्याचं जाहिर करत चर्चांना पुर्णविराम दिला. त्यानंतर युवा सेना प्रमुख पद कोणाकडे द्यायचं याची चाचपणी सुरु केली. यामध्ये काही आमदारांच्या मुलांची नावं चर्चेत आहेत. एवढंच काय ठाकरेंना ठाकरेंच्या नावानं भिडण्यासाठी बिंदू माधवांचा मुलगा निहार ठाकरेंचीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार लढाई सुरु आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर कोर्ट कचेरी आणि निवडणुक आयोगाच्या फे-या सुरु आहेत. यामध्ये या सुनावणींमध्ये कार्यकरिणींचा पाठिंबाही तितकाच महत्वाचा असतो. शिवसेनेतले आमदार फुटले तसेच आमदारांचे मुलंही शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे युवा सेनेलाही मोठं भगदाड पडलं. पण आदित्य ठाकरेंच्या कार्यकारिणीतले किती युवा सैनिक शिंदे गटात आले यालाही खुप महत्वाचं आहे. आतापर्यंत आदित्यच्या कोअर कमिटीतले समाधान सरवणकर आणि पुर्वेश सरनाईक हे दोघे शिंदे गटात आले आहेत. त्यात पुर्वेश सरनाईक हे ठाकरेंच्या युवा सेनेतले सचिव राहिले आहेत. निम्म्याहून अधिक युवा सेना विस्तारक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी बरीच पदं रिक्त आहेत ती भरण्यावर शिंदे गटाचा प्रयत्न आहे.
आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी श्रीकांत शिंदेशिवाय पर्याय नाही, असं मत शिंदे गटातल्या युवा सैनिकांचं आहे. जर अगदीच श्रीकांत शिंदे युवा सेना प्रमुख पद घेणार नसतील तर बिंदू माधवांचा मुलगा म्हणजे निहार ठाकरेला संधी द्यायची का? असाही विचार सुरु आहे. शेवटी सध्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे हो ब्रॅन्ड झाले आहेत. त्यामुळेच कोणता ब्रँड कोणावर भारी पडतोय हे येणार काळ ठरवेल.