(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवारांचा दावा
भाजपकडून एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यात आघाडीवर आहेत.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राज्यातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. सध्या भाजपकडून एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यात आघाडीवर आहेत. खडसे यांच्या नाराजीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही एकनाथ खडसेंची नाराजी दूर करणार आहोत. शिवाय येणाऱ्या काळात खडसे राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसू शकतील, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. मी पाटील यांना म्हटले आहे की, पक्षातील कोणताही नेत्याची, कार्यकर्त्याची कोणत्याही कारणावरुन नाराजी असल्यास आपण ती संवादातून दूर करायला हवी.
मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यासोबत पक्षातील प्रमुख नेते चर्चा करणार आहेत. खडसे हे भाजपचे मोठे नेते आहेत. गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी राज्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केलं आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघांनी खडसे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. त्यामुळे खडसे जर नाराज असतील, तर संवादाने हा प्रश्न मिटायला हवा. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, खडसे हे आक्रमक नेते आहेत. त्यांच्या आक्रमकपणाचा पक्षाला फायदा होईल. खडसे भाजपला सोडतील का? या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, खडसे हे मूळ भाजपवासी आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. उलट ते भविष्यात राज्याच्या विधिमंडळात किंवा दिल्लीतही दिसू शकतात.