एक्स्प्लोर
Advertisement
अभिनव प्रयोग... सोलापुरात रंगू लागल्या भिंती, बोलक्या भिंतीच्या माध्यमातून श्रमिकांच्या मुलांना शिक्षण
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केलीय मात्र अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. यावर सोलापुरातील शिक्षकांनी अभिनव प्रयोग नीलमनगर भागात केलाय, ज्याचं पालकांनी कौतुक केलंय.
सोलापूर : सोलापूर हे कष्टकरी आणि कामगारांचं शहर.. त्यामुळे अनेकांचं हातावर पोट आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले. तसं शाळा देखील बंद पडल्या. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली, मात्र कामगारांच्या शहरात अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. यावर जिल्ह्यातील काही शाळांनी वेगळे प्रयोग देखील केले. सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड शाळेने स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून थेट टीव्हीवरुनच शाळा शिकवण्यास सुरुवात केली. तर अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावातील शिक्षकांनी एक भन्नाट कल्पना लढवत थेट मंदिरं, समाजमंदिरांच्या भोंग्यावरुनच शालेय पाठ्यक्रम शिकवण्यास सुरुवात केली. असाच एक प्रयोग शहरातील नीलमनगर भागातील शाळेने केलाय.
सोलापूर शहराच्या पूर्व भागातील नीलमनगर हा परिसर विडी कामगार आणि गिरणी कामगारांची वस्ती असलेला भाग आहे. या परिसरात शेकडो कुटूंब राहतात, यात बहुतांश जण हे श्रमजीवी आहेत. हातावर पोट असलेल्या या कामागारांकडे स्मार्टफोन असण्याची शक्यता फारच कमी. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात इथं फार मोठी अडचण होती. त्यावर उपाय म्हणून इथल्या शिक्षकांना बोलक्या भिंतींची संकल्पना सुचली. आणि कामगार वस्तीतल्या या परिसरातील भिंती शालेय पाठ्यक्रमाने रंगू लागल्या.
180 हून अधिक भिंती शाळेतर्फे रंगवल्या
नीलमनगर परिसरातील आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादूल प्रशालेने हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवला आहे. शाळेतील सहशिक्षक राम गायकवाड यांनी ही अनोखी कल्पना सुचविली. त्यानुसार शाळेच्या परिसरातील भिंतीवर पाठ्यक्रमातील बाबी रंगवण्यास सुरुवात झाली. गणितातील सूत्रे, इंग्रजी-मराठी व्याकरण, अक्षर ओळख, यांसह इतर शालेय पाठ्यक्रम या भिंतीवर रेखाटण्यात आलं आहे. आतापर्यंत 180 हून अधिक भिंती शाळेतर्फे रंगवून झाल्या आहेत. तर 300 हून अधिक भिंती रंगवण्याचा मानस असल्याचं शाळेतील सहशिक्षिका आफरीन सय्यद यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहू नये
आकर्षक चित्रकृती, अक्षर, गणितीय आकडेमोड, विज्ञानातील प्रयोग, महापुरुषांची नावे, सामान्यज्ञान इत्यादी बाबी रंगबेरंगी पद्धतीने रेखाटण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शाळेत न जाताही विद्यार्थी आपल्या घराच्या आसपास त्यांना मिळेल त्या वेळात भिंतीवरील अक्षरं वाचतात, गणितांची सूत्रे पाठ करतात. "शाळा बंद असल्या तरी आपला विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहू नये, यासाठी हा प्रयत्न सुरु केला आहे. विद्यार्थी आवडीने पाठ्यक्रम वाचतात, त्यांच्यात चर्चा करतात. यामुळे समूह शिक्षणाला सुरुवात झाली आहे. आमचा विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहत नाहीये याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.'' अशी प्रतिक्रिया शाळेतील शिक्षक राम गायकवाड यांनी दिली.
ऑनलाईन शिक्षणाला वेगळा पर्याय
या अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हारुण पठाण, मुख्याध्यापिका तस्लीमाबानो पठाण, आफरीन सय्यद, सचिव मुमताज शेख, आसिफ पठाण यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या अनोख्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असून, आपली आर्थिक कुवत नाही हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शाळा शिकवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना स्मार्टफोन घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला वेगळा पर्याय आशा मराठी विद्यालयातील शिक्षकांनी शोधलाय. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग काही प्रमाणात का होईना पण सुकर झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement