Amar Mulchandani ED Raid : अमर मूलचंदानी यांच्या घरावर ईडीची छापेमारी; सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई
पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीसह आणखी काही ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.

Amar Mulchandani ED Raid : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह आणखी (Amar Mulchandani) काही ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. पिंपरीतमधील मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.
ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकला
मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचं वाटप केल्याचं आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. त्या अनुषंगाने हा छापा महत्वपूर्ण मानला जातो.
400 कोटी हून अधिक रुपयांचं कर्ज वाटप
सेवा विकार बॅंकेत मोठा घोटाळा झाला असून बनावट कागदपत्रं देऊन त्यामध्ये 400 कोटी हून अधिक रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावेळी अमर मुलचंदानी यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं होतं. मूलचंदानी हे पिंपरी - चिंचवडचे माजी नगरसेवक आहेत. या गुन्ह्यात लेखापाल पूजा पोटवानी, मुख्य व्यवस्थापक नीलम सोनवानी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश हिंदुजा, हिरू मुलाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लाखानी, सागर सूर्यवंशी, शीतल तेजवानी ऊर्फ शीतल सूर्यवंशी, बँकेचे व्यवस्थापक हरीश लक्ष्मणदास चुगवाणी,यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
सेवा विकास बॅंकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 25 शाखा आहेत. या बॅंकेत ठेवेदारांच्या ठेव्या आहेत. याच बॅंकेवर काही दिवसांपूर्वी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने प्रशासक नेमलेला होता. त्यामुळे या कारवाईकडे हजारो ठेवेदारांचं लक्ष लागलं आहे आणि ठेवेदारांना मोठा दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
जामीनावर बाहेर
या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मूलचंदानी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी सरकारी वकिलांना विरोध केला होता. त्यांना जामीन मिळाल्यास त्यांच्याविरोधातील पुरावे ते नष्ट करु शकतात. या सगळ्या घोटाळ्याला कर्जदार आणि बँक व्यवस्थापन जबाबदार आहे, असं कोर्टाने सांगितलं होतं. त्यानंतर मात्र त्यांना जामिनावर सोडलं होतं. आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
