Hasan Mushrif: साडे आठ तासांनंतर हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी संपली, सोमवारी पुन्हा हजर राहावं लागणार
ईडीने सुरू केलेल्या चौकशीप्रकरणी आपण त्यांना पूर्ण सहकार्य करत असून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असल्याचं राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची सुरू असलेली ईडी चौकशी तब्बल आठ तासांनंतर संपली आहे. सोमवारी पुन्हा त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलं असून या चौकशीमध्ये आपण त्यांना सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आपण काहीही केलं नाही त्यामुळे घाबरायचं कारण नाही असंही ते म्हणाले. आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत ईडीने त्यांची चौकशी सुरू केली आहे.
माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीकडून गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
न्यायालयाच्या या निर्देशानंतर हसन मुश्रीफ हे ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांची तब्बल आठ तास चौकशी केली.
दोन महिन्यात तीन वेळा छापेमारी
हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, अप्पासाहेब नलवडे कारखाना कर्ज प्रकरण तसेच ब्रिक्स कंपनीवरुन ईडीने दोन महिन्यात तीनदा छापेमारी केली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. 11 मार्च रोजी ईडीच्या पथकाने चौकशीनंतर बाहेर पडताना ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांना समन्स बजावले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांच्या जावयाने शेल कंपनीच्या माध्यमातून आर्थिक अफरातफरी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर दोन वेळा, तर घोरपडे कारखाना व जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखांवर यापूर्वी ‘ईडी’ने छापे टाकले आहेत. जिल्हा बँकेतून या दोन कारखान्यांना दिलेली कर्जे नियमानुसार असल्याचा खुलासा बँकेने केला असला, तरी मुश्रीफ यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा पडला.
ही बातमी वाचा: