(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh : 'आधी तुरुंगातलं जेवण घ्या, नंतर...' कोर्टानं अनिल देशमुखांना फटकारलं!
घरचं जेवण मिळावं, यासाठी देशमुखांनी केलेला अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. पण बेड आणि औषधं पुरवण्याचे निर्देश दिलेत.
Anil Deshmukh ED Custody : आर्थिक गैरव्यावहारप्रकरणी (Money Laundering case) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबईच्या विशेष न्यायालयानं (PMLA)14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु आहे. सोमवारी अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टानं त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देशमुखांनी केलेला अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. पण बेड आणि औषधं पुरवण्याचे निर्देश दिलेत. पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करु, असं न्यायालयानं सांगितलं. अनिल देशमुख यांनी घरचे जेवण मिळावे यासाठी अर्ज केला होता. मात्र, या अर्जावरील सुनावणी काही दिवसांनंतर होणार आहे. तोपर्यंत राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना इतर कैद्याप्रमाणे तुरुंगातील जेवण घ्यावे लागणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. देशमुखांना कोर्टानं दोन आठवड्याची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत घरच्या जेवणाची मागणी केली होती. कोर्टानं देशमुखांची ही मागणी फेटाळली. यावेळी कोर्टानं आधी तुरुंगातील जेवण खायला सांगत देशमुखांना फटकारलं. आधी तुरुंगातील जेवण खा, ते योग्य नसल्यास विचार करू, अस कोर्टांनी सुवाणीदरम्यान सांगितलं. मात्र, कोर्टानं देशमुखांना तुरुंगात स्वतंत्र बेड ठेवण्याची परवानगी दिलीय. यासाठीही त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं होतं. अनिल देशमुख यांना तुरुंगातील जेवणामुळे काही समस्या उद्भवल्यास घरच्या जेवणासाठी अर्ज करावा, असं कोर्टानं सांगितलं. त्यामुळे आता पुढील काही दिवस माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इतर कैद्यासोबत तुरुंगातील जेवण खावं लागणार आहे.
अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून युक्तीवाद केला. अनिकेत निकम यांनी कोर्टात सांगितलं की, देशमुख यांचं वय आणि आजारांचा विचार करुन त्यांना बेड, औषधं आणि घरचं जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायालयानं तुरुंगात स्वतंत्र बेड लावयची परवानगी दिली. शिवाय कारागृहातील डॉक्टरांना दाखवून औषधे नेण्याची परवानगी दिली आहे. जेवणासंदर्भात कोर्टानं अनिल देशमुख यांची याचिका तुर्तास फेटाळली आहे. तुर्तास घरचं जेवण करा, काही समस्या उद्भवल्यास घरच्या जेवणासाठी अर्ज करावा, असं न्यायालयानं सांगितलं.
आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावला होता. अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं अर्ज फेटाळला. ईडीनं अनिल देशमुख यांना सर्वात आधी 26 जून रोजी समन्य पाठवला होता. त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यलयात हजर झाले. चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलालाही ईडीनं दोनदा समन्स बजावण्यात आलंय. परंतु, ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत.