डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हल्लेखोरांना साक्षीदारांनी ओळखलं, दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या (Narendra Dabholkar) हल्लेखोरांना साक्षीदारांनी ओळखलं आहे. दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी आहेत.
Narendra Dabholkar Murder Case : सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना ओळखणारे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचार असून त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे.
20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी हे दोन सफाई कर्मचारी तिथे रस्ता साफ करण्याचे काम करत होते. दाभोलकर पुलावरून चालत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते शनिवार पेठेच्या दिशेने पळाल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला पुण्यातील विशेष न्यायालयात सुरु आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणी आज पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड झाली.
दरम्यान या प्रकरणी आज न्यायालयात निम्मी ओळख परेड झाली असून उर्वरित पुढील ओळख परेड 23 मार्च रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी सर्व आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. फक्त संजीव पुनाळेकर सुनावणीवेळी हजर नव्हता. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सर्व पाच आरोपींवर पुणे येथील शिवाजीनगरमधील नावंदर कोर्टात आरोपपत्र निश्चित झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pune Crime : मुलीला त्रास देणाऱ्याला महिलेकडून मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
- सायबर तज्ज्ञ म्हणून काम, पोलिसांना 10 खटल्यात मदत, पठ्ठ्याने बिटकॉईन घोटाळ्यात पुणे पोलिसांनाच गंडवलं!
- बिबट सफारी अर्थमंत्र्यांच्या बारामतीतच, वनविभागाकडून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, सफारी पुन्हा जुन्नरला आणा