महाविकास आघाडीत धुसफूस, नेत्यांची खलबतं; शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याचा काँग्रेसचा सूर
Maharashtra Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असून शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याचा काँग्रेसचा सूर आहे.
Mahavikas Aghadi : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या असमन्वयावर आज खलबतं होणार आहेत. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याचा सूर काँग्रेस नेत्यांमध्ये उमटत आहे.
उर्जा किंवा महिला-बाल कल्याण खात्याला मिळणारा निधी असो किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण. महाविकास आघाडीमधला असमन्वय वारंवार चव्हाट्यावर आला आहे. आणि त्यामुळं विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळत आहे. मिनी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतला फेविकॉल कमकुवत झालेला परवडणार नाही. म्हणूनच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत आपली कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. अनेक काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून त्यांची वारंवार प्रचिती आली आहे. त्यामुळं काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी शिवेसना, राष्ट्रवादी काही पावलं उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आग पाखड करताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होत आहे. काही काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुचंबणा होत असल्याची ओरड सुरू केलेली आहे. नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार या नेत्यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमधली ही धूसफूस शमवण्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. आता यानंतर तरी तीन पक्षांचा समन्वय दिसणार का? एकमेकांवरच्या कुरघोड्या थांबणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मनसे सोबत युती होणार नाही, हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे - चंद्रकांत पाटील
- महाराष्ट्राकडून महिलांच्या सुरक्षेचा आदर्श घालून दिला जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- किरिट सोमय्यांच्या फोटोवरून नवा वाद; काँग्रेसकडून कारवाईची मागणी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा