(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Dilip Walse Patil : दोन्ही आघाड्यांमध्ये सहा पक्ष असल्याने या सहा पक्षांमध्ये गणित बसवण्यास भरपूर वेळ असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट मुकाबला होत असला, तरी 23 नोव्हेंबरनंतर राज्यामध्ये ही समीकरणे कायम राहतील की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र स्पष्ट सुतोवाच केले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमधील सहा पक्षांची इकडून तिकडे अदलाबदली होणार की आणखी काही घडामोडी होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत यावरून खरं कॅल्क्युलेशन सुरू होईल
दिलीप वळसे पाटील यांनी आज (7 नोव्हेंबर) बोलताना सांगितले की, एका बाजूला महायुती आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. निवडणुकीनंतर युती येणार की आघाडी येणार हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू. तथापि, कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत यावरून खरं कॅल्क्युलेशन सुरू होईल, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काही समीकरणे बदलली जातील आणि मी हे सामान्यपणे सांगत असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले. जर गणितांचं समीकरण जुळलं नाही तर सरकार स्थापन करण्यासाठी गणित आणावं लागेल आणि काही ना काही करून सरकार स्थापन करावं लागेल असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये सहा पक्ष असल्याने या सहा पक्षांमध्ये गणित बसवण्यास भरपूर वेळ असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एक प्रकारे आता निकालानंतर सुद्धा जर दोन्ही आघाड्यांना बहुमताचा आकडा नाही मिळाल्यास तर पुन्हा एकदा 2019 प्रमाणे काही नवीन प्रयोग होणार का? याची आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
सदाभाऊ खोतांच्या टीकेनंतर दिलीप वळसे पाटील भडकले
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ बेलगाम झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील भडकले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेबांविषयी सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून, अतिशय संतापजनक वक्तव्य आहे. या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. तसेच या प्रकारची वक्तव्ये सर्वांनी टाळावीत व एक तारतम्य आणि भान बाळगून प्रचार करावा.
इतर महत्वाच्या बातम्या