Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केल्यानं मुंडेंची आमदारकी धोक्यात येणार का? हा प्रश्न आहे.
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केल्यानं धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात येणार का? हा प्रश्न आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत करुणा शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांची कबुली दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, करुणा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असं मुंडेंनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट
#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप #पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत कालपासून समाज... Posted by Dhananjay Munde on Tuesday, January 12, 2021
आता करुणापासून झालेली दोन मुले आणि कायदेशीर पत्नीपासून झालेल्या 3 मुली अशी पाच मुले असल्यानं मुंडे कायदेशीररित्या अडचणीत येऊ शकतात. धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचा आणि तीन मुलींचा उल्लेख केला आहे. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.
कायदा काय सांगतो?
- 2001 च्या अपत्याच्या कायद्यानुसार दोन अपत्यांमध्ये तिसऱ्या मुलाची भर पडल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.
- अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते.
- मुंडे यांनी दुसऱ्या महिलेपासून झालेल्या दोन मुलांची माहिती लपवली आहे.
- ही मुले 2001 नंतर जन्मलेली असतील तर मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
- शिवाय निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणं गुन्हा आहे.
एकीकडे धनंजय मुंडेंना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो तर दुसरीकडे पोलीस चौकशीची टांगती तलवार मुंडेंवर आहे. पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही. मात्र प्राथमिक चौकशी पोलीस करू शकतात. 2006 खाली बलात्कार झाल्याचा आरोप पीडितेने धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. त्यामुळे या जुन्या प्रकरणात लगेच गुन्हा दाखल होईल असं नाही. पण तक्रार दिल्यामुळे प्राथमिक चौकशी होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात मुंडेंची राजकीय अडचण होणार हे नक्की आहे.
रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केलेत?
रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल रेणू यांनी केला आहे. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे.
रेणू शर्मा यांचं ट्वीट
I have lodged complaint of Rape @MumbaiPolice @CPMumbaiPolice against #DhananjayMunde no action till now @PawarSpeaks @supriya_sule @UdhavThackeray . Oshiwara police station is not even accepting my written complaint @Dev_Fadnavis my life is in threat please help @narendramodi pic.twitter.com/mf4ZlHxd6A
— renu sharma (@renusharma018) January 11, 2021
तज्ञ काय सांगतात? या संदर्भात ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. ते या पोस्टमध्ये म्हणतात की, हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता करता येत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेले असतांना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते. धनंजय मुंडे यांचे कायदेशीर लग्न झाले आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी दुसरे लग्न केले नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत ' विवाहासारख्या ' संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही. आणि एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहा-सारखे संबंध ठेवणे याविरोधत एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासरखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते. धनंजय मुंडेंच्या बाबतीत या दोन्ही स्त्रियांची काहीही तक्रार नाही. तसेच निवडणुकीच्या आधी उमेदवाराने जी माहिती माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणेच आवश्यक आहे. त्याअर्थाने धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असे म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतीज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. कुणी तक्रार केली तर निवडणूक आयोग याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे लोकप्रतिनिधीत्व म्हणजेच आमदारकी रद्द करू शकते. निवडणूक आयोगाने स्वतःहून अश्या प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेतल्याची उदाहरणे नाहीत तसेच निवडणूक आयोग काहीच करत नाही असाच सार्वत्रिक समज आहे, असं सरोदेंनी म्हटलंय.
सरोदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी त्यांना बायको असल्याची माहिती न देताच प्रतीज्ञापत्र दाखल केले. खूप गाजावाजा झाला. मग पुढील निवडणुकीत मोदींनी बायको असल्याचे व लग्न झाल्याचे जाहीर केले. पण तेव्हाही मोदींवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुलांबाबत माहिती न दिल्याने धनंजय मुंडेंवर निवडणूक आयोग कडक कारवाई करेल याबाबत साशंकता आहे. मात्र राजकीय व नैतिक अधिकार असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून काढू शकतात. पूर्वी विवाहाशिवायच्या संबंधातून झालेल्या मुलांना ' अनौरस' , नाजायज असे म्हणायचे पण तसे म्हणणे चुकीचे आहे असे स्पष्ट करतांना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, स्त्री-पुरुषांचे संबंध कायदेशीर किंवा बेकायदेशीर असू शकतात पण कोणतेच मूल बेकायदेशीर नसते. धनंजय मुंडे यांनी मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी मुलांना स्वतःचे नाव वडील म्हणून दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रतीज्ञापत्रात त्या मुलांचा उल्लेख करणे आवश्यक होते. दुसरा एक मुद्दा समजून घ्यावा की, अशा एक्सटेंडेड पारिवारिक नातेसंबंधांना स्वीकारण्याची व त्याबाबत जबाबदारी घेण्याची प्रवृत्ती समाजात अस्तित्वात येत असेल तर त्याचा समावेशक विचार झाला पाहिजे. प्रत्येकांनी असे संबंध करावे असे मुळीच नाही पण त्याबाबत बोलण्याचा मोकळेपणा आणि स्वीकारहार्यता मात्र वाढली तर अश्या संबंधांमध्ये असलेल्या स्त्रियांवरील अन्याय कमी होतील व त्यांना हक्क मागतांना ते सोयीचे ठरेल, असं सरोदे यांनी म्हटलंय.
असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट
धनंजय मुंडे प्रकरण - हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता करता येत नाही. द्विभार्या...
Posted by Asim Sarode on Wednesday, January 13, 2021