Parbhani Band : 'परभणी बंद'ला हिंसक वळण; संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ, प्रशासनाचे शांततेचे आवाहन
Parbhani Violance : संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेल्या या निषेध आणि बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची मोठी तोडफोड केलीय.
Parbhani Violance : परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याचे असून आले. मात्र दुपारपर्यंत शांततेत सुरू असलेल्या या निषेध आणि बंदला हिंसक वळण लागले आहे.आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची मोठी तोडफोड केलीय. पोलिसांच्या गाड्यांवर जमावकडून दगडफेक करण्यात आली आहे. आता परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापार्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप ही पेटवून देण्यात आले असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. दरम्यान या गर्दीला पांगवण्यासाठी परभणी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे.
संतप्त जमावाकडून पीव्हीसी पाईपांची जाळपोळ
परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला आता हिंसक वळून लागले असून मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी बंद दुकानावर दगडफेक केलीये. तसेच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आलीय. यात काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचा दिसून येते असून पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले आहे. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातील सर्वच नेत्यांकडून जमावाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करत घटनेचा निषेध करणाचे आवाहन केले आहे. तर घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
आरोपीला अटक, नागरिकांनी शांतता राखावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची काच फुटल्याने वातावरण थोडं बिघडलं आहे. काही कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले आहेत. आम्ही संबंधित इसमाला अटक केली आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आपण हार घातला आहे. आमचे नागरिकांना आवाहन आहे की, कायदा-सुव्यवस्था बिघडून देऊ नये. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गैरकृत्य करु नये. शांतता राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये कडकडीत बंद
परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ आज वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मोर्चा काढत आंबेडकरी जनतेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वसमत शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी जनता सहभागी झाली होती. भव्य आक्रोश मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जात आंबेडकरी जनतेच्या वतीने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.