आता प्रत्येक ग्रामपंचायतीत बसवणार पर्जन्यमापन यंत्र, धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र (Rain Gauges Machine) बसवण्याचे नियोजन सुरु असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी केली.
Dhananjay Munde : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र (Rain Gauges Machine) बसवण्याचे नियोजन सुरु असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी केली. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल असे मुंडे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात 'ड्रोन मिशन' राबवणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी केली. शेतकऱ्यांना दोन्ही हातांनी देण्याची नियत असलेले हे सरकार आहे. नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत मांडली.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचे सरकार गेले, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवरायांचे शेतकरी धोरण याला अनुसरुन प्रामाणिक काम करणारे सरकार आहे. दोन्ही हातांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत असलेले हे सरकार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
आज विधानपरिषदेत नियम 97 अंतर्गत चर्चेच्या उत्तराच्या निमित्ताने मुंडे बोलत होते.
नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना मदत
राज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हफत्यापोटी 1720 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी चार महिने विशेष मोहीम राज्यभर राबवण्यात आली. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना अग्रीम 25 टक्के प्रमाणे 2216 कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत 1700 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम वितरण सुरू आहे. सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यानी केंद्र सरकार कडे अपील केले असून, ती सुनावणी पूर्ण होताच या सहा जिल्ह्यांचा विमा देखील अग्रीम प्रमाणे दिला जाईल. या वर्षी अग्रीम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील 5 वर्षातील रक्कमेच्या तुलनेत अनेक पटींनी मोठी आहे, हेदेखील मुंडेंनी आकडेवारी सह सभागृहासमोर मांडले.
अवकाळी आणि गारपीटीचे अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दराने मंजूर करण्यात येत असून यांतर्गत बाधित शेतकऱ्यांना सुमारे 1458 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण देखील सुरू केले आहे, असेही मुंडे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, फळपिकविमा, यांसह शासनाने लाभ दिलेल्या अन्य योजनांची देखील आकडेवारी विधानपरिषदेत दिली.
शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळणार
राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायातीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल असेही धनंजय मुंडे म्हणाले.
राज्यात 'ड्रोन मिशन' राबवण्यात
शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात 'ड्रोन मिशन' राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी यावेळी केली, तसेच यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत 'शेतकरी सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राज्यकर्ते सुखी!' शेतकऱ्याला त्रास होऊ नये असे त्यांचे धोरण होते.त्याला अनुसरूनच आमचे हे सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्रच सभागृहात वाचून दाखवले.
महत्त्वाच्या बातम्या: