(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या भाविकांनी कोविड चाचणी करावी, वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
हरिद्वार इथल्या कुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानादरम्यान मोठी गर्दी झाली होती. परिणामी मागील पाच दिवसात 1700 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या वर्ध्यातील भाविकांनी परत आल्यावर कोरोना चाचणी करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलं आहे.
वर्धा : हरिद्वार (उत्तराखंड) येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी वर्धा जिल्ह्यातून गेलेले काही भाविक आता परतीच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यात वाढत असलेली कोविड रुग्णांची संख्या आणि दिवसेंदिवस होत असलेला विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कुंभमेळ्याहून परतणाऱ्या सर्व भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वतः कोविड सेंटर इथे जाऊन कोविड तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलं आहे.
तसंच संबंधित व्यक्तींनी गृहविलगीकरणात राहून नियमांचे कोटेकोरपणे पालन करावं. कुंभमेळ्यात गेलेल्या आणि परत आल्यावर गृहविलगीकरणात न राहणाऱ्या व्यक्तींबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी वर्ध्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला 100 या क्रमांकावर संपर्क करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक
हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाचे औचित्य साधत मोठ्या संख्येने साधू-संत गंगा नदीत स्नान करत असल्याचं पाहायला मिळाले. यामध्येच 48.51 लाख जण सहभागी झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर,बहुतांश राज्यांनी निर्बंध लागू केलेले असताना हरिद्वारमधील कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला. 10 ते 14 एप्रिल कुंभमेळ्याच्या परिसरातील 1700 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत पाच दिवसात 2,36,751 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1701 जणांना कोरोनाची लागण झाली.
हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभु कुमार झा म्हणाले, "आतापर्यंत मागील पाच दिवसात केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्टचे हे आकडे आहेत. अजूनही काही जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. पण परिस्थिती पाहता हा आकडा 2000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे."