Devendra Fadnavis on Ajit Pawar : अजितदादा म्हणतात, आताही सीएम व्हायला आवडेल, त्यावर आता डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस म्हणतात...
अजित पवार यांची मुलाखत मी पाहिली नाही, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर यात काही गैर नाही. अनेकांना ते आवडते, पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला.
Devendra Fadnavis on Ajit Pawar : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत होय, मला 100 टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे ठामपणे सांगितले. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून अजितदादा समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अजितदादांनी मनोकामना व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटण्यास सुरुवात झाली. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर त्यात गैर काही नाही. त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांची मुलाखत मी पाहिली नाही. कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर यात काही गैर नाही. अनेकांना ते आवडते, पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीला टोला
अजित पवारांवरून सुरु असलेल्या चर्चेवरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीत काय चाललं आहे हे मला माहीत नाही. ते स्वतःला 'वज्रमुठ' म्हणवून घेतात पण त्याला अनेक तडे आहेत. ती 'वज्रमुठ' कधीच असू शकत नाही.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभेत 2024 च्या निवडणुकीमध्ये कशाला? आताही आमच्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवण्याची आमची तयारी आहे. होय, मला मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल,असे निक्षून सांगितले. या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. आज पुण्यातही दादांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागले. मात्र, त्यावरून पक्षाचे चिन्ह नसल्याने राजकीय भूवया उंचावल्या.
संजय राऊत म्हणतात, अजित पवारांना माझ्या शुभेच्छा
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही? मुख्यमंत्री होण्याची क्षमता अजित पवार यांच्यात आहे. सर्वाधिक वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला आहे. मात्र अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळते. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची अनेकवेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या