Devendra Fadnavis : देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये, तरीही मंत्रीपद कायम; मलीकांच्या समोरच फडणवीस थेट बोलले
Devendra Fadnavis : फडणवीस यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला.
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला आणि ते जेलमध्ये देखील गेले. मात्र. जेलमध्ये गेल्यावर देखील त्यांचे मंत्रीपद काढण्यात आले नाही. त्यामुळे आधी याचे उत्तर द्या आणि त्यानंतर आम्हाला विचारा असे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी खुद्द नवाब मलिक देखील सभागृहात उपस्थित होते.
ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे आरोप केले आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षांवर केला होता. यालाच उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, "मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील, त्याला आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही अशी भूमिका ज्या नेत्यांनी घेतली ते आता इथे भूमिका मांडत आहे. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजूला अजितदादा बसले आहे. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल, देशद्रोहाचा आरोप झाल्यावर देखील, आणि ते जेलमध्ये असताना सुद्धा तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही. याचे उत्तर आधी द्या त्यानंतर आम्हाला विचारा, असे फडणवीस म्हणाले.