(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadanvis : मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो, आता टीका करणारे त्यावेळी घरात बसून होते, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Devendra Fadanvis : आता आमच्यावर टीका करणारे त्यावेळी घरात लपून बसले होते, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता केवळ वक्तव्य करत आहे. कार सेवेच्या वेळी हे लोक आपापल्या घरात लपून बसले होते. आज हे लोक राजकीय वक्तव्य करत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकारही नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. इंडिया टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील कारसेवेबद्दल भाष्य केलं. तसेच त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला.
अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरू आहे. श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखती दरम्यान म्हटलं. ते म्हणाले की, माझ्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात भगवान श्री रामाचे खूप महत्त्व आहे.माझी राजकीय सुरुवात रामाच्या शिलापूजन कार्यक्रमापासून झाली आणि मी कारसेवक म्हणून चळवळीत सहभागी झालो आणि तिन्ही कार सेवेत सहभागी झालो. रामाशी माझे भावनिक नाते आहे.
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपण सर्वजण आदर करतो, असं फडणवीसांनी म्हटलं. हिंदुत्वाची बाजू मांडणारा तो सिंह होता. बाळासाहेब ठाकरे यांना विचारण्यात आले की बाबरी शिवसैनिकांनी पाडली का? तर ते म्हणाले की हो, माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिथे गेलो नाही. आम्ही राम भक्त कारसेवक म्हणून गेलो होतो. उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक जे आज विधाने करत आहेत, त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. सर्वजण घरात गुपचूप बसले होते. आज हे लोक राजकीय वक्तव्य करत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकारही नाही. तिथे कोणीच नव्हते, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.
मी कारसेवक म्हणून सहभागी होतो - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीवेळी कारसेवक म्हणून सामील झाल्याचं सांगितलं. यावर त्यांनी म्हटलं की, ऑक्टोबर 1990 च्या पहिल्या कारसेवेत मी नागपूरहून विनातिकीट रेल्वेने गेलो होतो. देवराह बाबांच्या आश्रमात मुक्काम केला. मंदिराच्या छतावर मोकळ्या आकाशात झोपायचे. थंडीचे वातावरण असल्याने शरीर आक्रसले पण आम्ही ठामपणे उभे राहिलो.मग एके दिवशी आम्ही अयोध्येकडे निघालो पण पोलिसांनी आम्हाला एका पुलावर अडवले आणि दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडल्या जात होत्या. काही कारसेवकांनी नदीत उड्या मारल्या. काही कारसेवकांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आम्हाला अटक करण्यात आली, तेथून मला बदायूं तुरुंगात पाठवण्यात आले आणि तेथे मला अनेक दिवस कैदेत ठेवण्यात आले.