दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉन, मग आता बुस्टर डोस घ्यावा की, नाही? अजित पवारांचा केंद्राला सवाल
Ajit Pawar on Omicron Corona Variant : ओमायक्रॉनबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश होत आहे. या पार्श्वभूमीवर कडक भूमिका घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Ajit Pawar on Omicron Corona Variant : ओमायक्रॉनचं वाढतं संकट पाहता, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कडक धोरण जाहीर करणं आणि अवलंबनं हे अतिशय गरजेचं आहे. ज्या-ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत, तिथे एक वेगळी विशिष्ठ नियमावली असायला हवी, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच बुस्टर डोसबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं लवकरात लवकर स्पष्ट करावा, बुस्टर डोस द्यायचा आहे, तर तो का द्यायचाय? आणि जर नाही द्यायचाय, तर का नाही द्यायचाय? याचं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. असंही अजित पवार म्हणाले. तसेचस ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) तातडीनं पावलं उचलली पाहिजे, असंही ते म्हणाले.
इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांबाबत केंद्र सरकारनंही कडक भूमिका घेणं गरजेचं : अजित पवार
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ओमायक्रॉनच्या संकटावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "ओमायक्रॉनबाबत मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाचं बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांतही इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांबाबत केंद्र सरकारनंही कडक भूमिका घेणं गरजेचं आहे. जिथे-जिथे देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या सर्व ठिकाणी नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय की, नाही? हे पाहणं गरजेचं आहे."
ओमायक्रॉनबाबत देशपातळीवर आरोग्य विभागानं आणि डब्ल्यूएचओनं स्पष्टीकरण द्यावं : अजित पवार
"दोन वर्षांपूर्वीच्या मार्च महिन्यात एक जोडपं दुबईहून राज्यात आलं. त्यानंतर त्यांना घरी सोडणाऱ्या ड्रायव्हरला कोरोना झाला आणि तो संपूर्ण राज्यभरात फोफावला. आताच्याही काळात देशातील वेगवेगळ्या राज्यांत एक-दोन असे रुग्ण आढळून आले होते. पण जिथे कुटुंबाला लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकजण सांगतात काळजी घ्या, मास्क वापरा याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. पण यासंदर्भात देशपातळीवर आरोग्य विभागानं आणि डब्ल्यूएचओनं याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे.", असंही अजित पवार म्हणाले.
बुस्टर डोसची गरज आहे का? देशपातळीवर निर्णय घेणं आवश्यक : अजित पवार
"याप्रकरणी अधिक माहिती घेतल्यानंतर स्पष्ट झालं की, ज्यांनी दोन डोस घेतले होते. त्यांनाच या व्हेरियंटची बाधा झाली आहे. मग बुस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंदर्भातही देशपातळीवर निर्णय घेणं आवश्यक आहे.", असंही अजित पवार म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला 'शिका आणि संघटीत व्हा' अशी शिकवण दिली : अजित पवार
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला 'शिका आणि संघटीत व्हा' अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क आणि समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा अनेकांनी आपापल्या घरुनच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन. महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख, सामाजिक न्यायमंत्र धनंजय मुंडे, चैत्यभूमीवर दाखल झाले होते. ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करु नये आणि घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.