Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करा, दादाधाम एक्स्प्रेस पुन्हा सुरु करा; नागपुरातील रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
छत्तीसगढ येथून नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना परत जाण्यासाठी दुपारी 2 ऐवजी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांची वेळ झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो, असेही प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
Nagpur Railway Station News : बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. रायपूरहून नागपुरात (Nagpur Railway) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना परत जाण्यासाठी दुपारी 2 ऐवजी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांची वेळ झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. वंदे भारतच्या वेळेत बदल केल्यास मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळू शकतील. तेव्हा याकडे लक्ष देण्याची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे.
कामठी, तुमसरमध्येही वंदे भारतला थांबा देण्याची मागणी
विदर्भातील ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस असल्याने स्थानिकांना तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र शेजारच्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, दुर्ग आणि रायपूर येथे थांबे दिले आहेत, तर विदर्भात फक्त गोंदिया इथे थांबा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशाच्या विकासासाठी या सेमी हायस्पीड ट्रेनचा विदर्भासाठी काय उपयोग? त्यामुळे वंदे भारतला गोंदियाशिवाय कामठी आणि तुमसर येथेही थांबे देण्यात यावेत, अशी मागणी माजी विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी केली होती.
वेळीची बचत होणार
तुमसर-भंडारा भागाला विदर्भाचा आणि छत्तीसगड हा परिसर देशात तांदळासाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची ये-जा सुरु आहे. तुमसर ते भंडारा हे अंतर फक्त 30 किमी आहे. अशा स्थितीत तुमसरमध्येही वंदे भारतला थांबा मिळाला, तर या परिसरातील प्रवाशांना फायदा होईल. कोविडनंतर तुमसरहून अनेक गाड्यांच्या थांब्यामध्ये आधीच मोठी कपात झाली आहे. अशा परिस्थितीत लहान-मोठ्या व्यावसायिकांना आपला वेळ वाचवण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला तुमसर येथे थांबा मिळाल्यास लोकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल.
एफओबीला मेट्रोशी जोडा
मुख्य रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात मेट्रो रेल्वे सुरु झाल्यानंतर या बाजूने प्रवाशांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मात्र एफओबीला (Foot Over Bridge) मेट्रो स्थानकाशी जोडण्यात न आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे आणि मेट्रोच्या संयुक्त विद्यमाने 40 फुटांचा नवीन एफओबी झाल्यास प्रवाशांच्या अडचणी सुटणार आहेत. मुख्य रेल्वे स्थानकातून मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
'या' मागण्यांकडेही लक्ष देण्याची मागणी
याशिवाय प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेवून 22111/22112 नागपूर-भुसावळ-नागपूर दादाधाम एक्स्प्रेस पुन्हा सुरु करावी तसेच 01139/01140 नागपूर-मडगाव-नागपूर स्पेशल ट्रेन नियमित करा, विदर्भ एक्सप्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील फूड स्टॉलवर 15 रुपयांची रेल नीरची बॉटल 20 रुपयांना विकली जात आहे याकडे रेल्वेने लक्ष देण्याची गरज आहे.
ही बातमी देखील वाचा...