राष्ट्रपती राजवटीची मागणी म्हणजे भाजपचं षडयंत्र, मागणी करणारे पक्ष प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भाजपच्या युतीचा भाग : सचिन सावंत
सध्या विरोधकांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. अशातच भाजपचे मित्रपक्षही ही मागणी करत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपचं षडयंत्र असून अशी मागणी करणारे पक्ष प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भाजपच्या युतीचे भाग असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. याचा समाचार घेताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, "सध्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी पक्ष करतात हे भारतीय जनता पार्टीकडून सरकार विरोधात जे षडयंत्र रचले जात आहे त्याचाच एक भाग आहे. कारण जे पक्ष ही मागणी करतात ते पक्ष भाजपचेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने घटक आहेत."
केंद्रीय काँग्रेसचे मंत्री राशिद अल्वी यांना जी मागणी केली होती त्या मागणीबाबत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, "मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायची जी मागणी यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना केली आहे ही मागणी त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका होऊ शकत नाही. सध्या भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. यासाठी अधिकार्यांना प्रलोभनं देणं देखील सुरु आहे. परंतु राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाल व्यवस्थितरीत्या पूर्ण करेल. सध्या भारतीय जनता पार्टीकडून केंद्रातील ज्या सर्व यंत्रणा आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा पद्धतीचा दबावतंत्र वापरून राज्यातील सरकार पाडण्याचा डाव जर कुणी रचत असेल तर तो कदापिही पूर्ण होणार नाही."
"मागच्या सहा वर्षांमध्ये भाजप सरकारने अनेक अधिकाऱ्यांना प्रलोभने दिली या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बदल्या करण्यात आल्या विनोद राय या अधिकाऱ्याला भाजप सरकार असताना कशा पद्धतीने बढत्या मिळाल्या हे सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, त्याच पद्धतीने स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा देखील त्यांनी राजीनामा द्यायला हवा. आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा पुण्यामध्ये दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. यासोबतच खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली, त्यावेळी त्यांच्या पत्रामध्ये भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे नाव आहे. त्यांनी त्याचा देखील तत्काळ राजीनामा घ्यायला हवा. भाजप सध्या केवळ आरोप करत आहे, कृती काहीच नाही.", असं सचिन सावंत बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- भाजपच्या मनात महाराष्ट्रातील सत्ता गेल्याची सल; त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : भास्कर जाधव
- मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी; परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
- गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप
- पबवर कारवाई केली म्हणून निलंबन, पोलीस निरीक्षकाचे परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप
- परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह