Sangli : कार चालकाचा निर्दयीपणा, बंपरवरुन बालकाला नेले सहा किलोमीटर फरफटत
Sangli News Update : कार चालकाने एका बालकाला बंपरवरुन सहा किलोमीटर फरफटत नेले आहे. त्यामुळे या अपघातात त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हा अपघात झाला आहे.
Sangli News Update : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका कार चालकाचा निर्दयीपणा दिसून आला आहे. या कार चालकाने एका बालकाला महामार्गावरुन सहा किलोमीटर फरफटत नेले आहे. त्यामुळे या अपघातात त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. अब्दुल समद साजिद शेख असे या अडीच वर्षीय बालकाचे नाव आहे.
अपघातानंतर मोटारीच्या बंपरवर हे बालक अडकले. परंतु, कार चालकाने त्या बालकाला तसेच तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असून या अपघातात बालकाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
साजिद खान नालसाब शेख आणि त्यांच्या पत्नी जबीन शेख कामानिमित्त धावडवाडी गावात बुलेट गाडीवरून आपल्या अडीच वर्षीय मुलाला घेऊन आले होते. शेख दांपत्य आपले काम संपल्यानंतर शेताकडे जात होते. यावेळी महादेव मधुकर कुंडले हा चालक मोकाशी वाडी येथील भाडेकरूंना घेऊन सांगलीकडे निघाला होता. यावेळी धावडवाडी जवळ शेख यांच्या बुलेट गाडीला कारने जोरदार धडक दिली. या धडकेत शेख दाम्पत्य गाडीवरून खाली कोसळले. परंतु, अब्दुल हा कारच्या बंपरवरमध्ये अडकला. बंपरमध्ये अडकलेल्या अवस्थेतच त्याला तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेले.
अपघात झाल्यानंतर चालक अब्दुल याला घेऊन तसेच निघून गेला. चोरुची गावानजीक आल्यानंतर त्याला बालक गाडीत अडकल्याचे लक्षात आले. कार थांबवून अब्दुल याला खाली उतरवले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
शेख दाम्पत्याला धडक देऊन निघून गेलेल्या चालकाचा गावकर्यांनी पाठलाग करून त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिकांनी साजीद खान शेख आणि जबीन शेख यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून कार चालक महादेव कुंडले याच्यावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दोन दुर्देवी घटना; 5 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात हळहळ
अखेर सांगली बँकेचा 'तो' निर्णय मागे; स्वाभिमानीच्या आक्रमकतेनंतर संचालक मंडळाची माघार