Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दोन दुर्देवी घटना; 5 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात हळहळ
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील दोन दुर्देवी घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विवाहितेची दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या तर दुसरीकडे विजेच्या धक्याने मायलेकीचा मृत्यू.
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील विटा आणि जत भागात दोन दुर्देवी घटना घडली आहे. यातील एका घटनेत विवाहितेनं दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेत विजेच्या धक्यानं मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. विटामध्ये तर एक महिन्याचं बाळ आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत आईनं आत्महत्या केली असून आत्महत्या मागचं कारण अस्पष्ट आहे.
विटा शहरातील शाहूनगर उपनगरात वास्तव्यास असलेल्या विवाहितेनं आपल्या दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनाली बिहुदेव हात्तेकर (वय 26) या महिलेनं तिची मुलगी आरोही (वय 4) आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकली आणि आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हत्तेकर ही आपली चार वर्षांची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली आणि दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत.
त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेनं दोन चिमुरड्यासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी समजली.. त्यावेळी विवाहिता सोनाली हिच्यासह तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आले. यावेळी पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तिघांचे मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, या घटनेतील मृत विवाहितेचा पती बिहुदेव हा मजुरीचे काम करत आहे. यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही घटना किरकोळ घरगुती वादातून झाल्याचे समजते. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे शेतात टाकलेल्या विजेच्या तारेचा धक्का (शॉक) लागून सौ. सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय 50) आणि विद्या संजय हेळवार (वय 25) या मायलेकीचा मृत्यू झाला आहे.
हेळवार कुटुंब गेल्या 60 ते 70 वर्षांपासून जाडरबोबलाद येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराशेजारीच एका शेतात मका आणि ज्वारी सारखे पीक घेण्यात आलं आहे. शेती गावालगत असल्यानं डुकरांचा उपद्रव आहे. या डुकरांच्या उपद्रवासाठी शेतकऱ्यांनं शेतीभोवती तारेच्या कुंपणातून करंट सोडला होता. विद्याश्री हेळवार शौचालयासाठी गेल्या असता त्यांचा पाय तारेवर पडल्यानं त्यांना शॉक लागला आणि त्यावेळी त्या जोरात किंचाळल्या. मुलीचा आरडाओरडा ऐकून आई सुवर्णा हेळवार सुद्धा त्या ठिकाणी धावल्या आणि त्यांचाही पाय त्या तारांवर पडल्यानं त्या दोघींना शॉक लागून त्या जागीच ठार झाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मुलुंडमध्ये पडलेल्या दरोड्याची तीन दिवसांत उकल; आठजणांच्या टोळीला बेड्या
- Kalyan: अज्ञात चोरट्यांकडून घरातील दागिन्यांची चोरी, वृद्ध महिला आणि तिच्या मुलीला मारहाण
- Nashik Crime : गॅस गिझरनं जीव घेतला? एअर इंडियाच्या महिला वैमानिक रश्मी गायधनी यांचा बाथरुममध्ये मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha