(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मातृ दिनी काळाचा घाला! मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेणाऱ्या आईचाही मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना
एकीकडे मातृदिन साजरा होत असतानाच बीडच्या गेवराईमध्ये मात्र हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला चिमुकला नदीपात्रात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी मातेने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
बीड : आज मातृ दिनाच्या निमित्ताने सोशल मीडिया वरती आपल्या आईबद्दलच्या आठवणी प्रत्येक जण जागवताना पाहायला मिळतंय. मात्र हा मातृदिन साजरा होत असतानाच बीडच्या गेवराईमध्ये मात्र हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. धुणे धुण्यासाठी आईसोबत गेलेला चिमुकला नदीपात्रात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी मातेने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मातृदिन घडलेल्या घटनेमुळे गेवराई परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
35 वर्षाच्या पल्लवी ढाकणे व 4 वर्षाचा समर्थ ढाकणे असे त्या माय-लेकाचे नाव आहे. संगम जळगाव येथील गोदापात्रात पल्लवी या आज धुणे धुण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा समर्थ मागे लागला. 'मी धुणं धुवून येते', असे समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु रडू लागल्याने त्यांनी त्यास सोबत नेले. नदीकाठी त्या धुणे धुण्यात मग्न असताना खेळता खेळता समर्थ हा पात्रात उतरला. नाकातोंडात पाणी गेल्यानंतर तो बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे पाहून पल्लवी यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, मुलाला वाचविताना मातेचाही बुडून मृत्यू झाला.
बुडालेल्या माय लेकराला वाचवण्यासाठी काही तरुणांनीही पाण्यात उड्या घेतल्या, पण तोपर्यंत उशीर झाला होता. मातृ दिनाच्या दिवशीच आपल्या आईसोबत चिमुकल्याचा मृतदेह पाहणारांचे डोळे पाणावले.
गेवराई पोलिसांनी धाव घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी मातेने जिवाची बाजी लावली. दुर्दैवाने हे प्रयत्न निष्फळ ठरले. मातृत्वदिनी मातृत्वाच्या प्रत्यय आल्याने कुटुंब, नातेवाईक व ग्रामस्थांनाही गलबलून आले होते.