(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिर्डीत सार्वजनिक शौचालयात मृतदेह सापडला, खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा
शिर्डी बस स्थानकासमोरील नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात एक मृतदेह सापडला होता. त्या हत्येचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये केला आहे.
शिर्डी : शिर्डी येथील सार्वजनिक शौचालयातील हत्येचा 12 तासांच्या आत उलगडा करण्यात शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आहे. मृताजवळील पैसे हिसकावताना त्याने विरोध केल्याने तिघांनी त्याची हत्या केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
शिर्डी बस स्थानकासमोरील नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात शनिवारी (13 जून) एका अज्ञात व्यक्तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला होता. डोक्यात, पायावर सिमेंटचे ब्लॉक आणि कोणत्या तरी हत्याराने हल्ला करुन या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसंच त्याचा चेहऱ्यावरही वार केले होते. या खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
शंकर उर्फ अन्ना असं मृताचं नाव असून तो गेल्या दोन वर्षापासून शिर्डीतच राहत होता. कधी मोलमजुरी तर कधी भीक मागून तो आपला उदरनिर्वाह करायचा. आरोपींना त्याच्याकडे पैसे असावेत असा संशय आला आणि 12 जूनच्या रात्री आठ ते दहाच्या सुमारास तिघांनी त्याकडील थोड्या पैशांसाठी निर्घृण हत्या केली. मयताची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने आरोपींनी त्याच्या अंगावरील कपडे काढून चेहऱ्यावर वार केले.
मिळालेल्या माहितीवरुन, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन राजेंद्र गोविंद गवळी (वय 30 वर्षे) सुनील महादेव कांबळे (वय 21 वर्षे) आणि सुनील शिवाजी जाधव (वय 30 वर्षे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. हे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्यात जिल्ह्यातून शिर्डी इथे आले असून ते इथेच मोलमजुरी करतात. तसंच साईबाबा मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करतात.