एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रत्नागिरीत जिल्हा परिषद शाळांमध्ये गॅदरिंगदरम्यान 'आयटम साँग'वर डान्स करण्यास बंदी!
चोली के पिछे, पल्लू के नीचे, शिला की जवानी आणि मुन्नी बदनाम सारखी गाणी आता रत्नागिरीतल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वाजणार नाहीत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ही गाणी न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयटम साँगवर डान्स करण्यास बंदीचा निर्णय जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे. जिल्ह्यातल्या 2500 शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास 40 हजार विद्यार्थी सध्या शिकत आहेत. तर, सात हजार शिक्षक काम करत आहेत. चार दिवसांपूर्वी रोहन बने देवरुख तालुक्यातील कोसुंब या गावी जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गेले होते. त्यावेळी कार्यक्रमादरम्यान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयटम साँगवर डान्स केला. यानंतर तडक रोहन बने यांनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आयटम साँगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसं परिपत्रक देखील त्यांनी जारी केलं.
दरम्यान, त्यांच्या या निर्णयाची सध्या जिल्ह्यात, राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रोहन बने यांनी महिनाभरात घेतलेल्या निर्णयाचं पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केलं आहे. अशा प्रकारचे निर्णय झालेच पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पालक आणि शिक्षकांनी दिली.
या निर्णयाबद्दल बोलताना आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्या राज्याला वेगळा असा संस्कृतिक वसा आहे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत आणि ते झाले देखील पाहिजेत. म्हणून हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया बने यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
मोबाईलपासून कसं दूर ठेवणार?
जिल्हा अध्यक्ष रोहन बने यांच्या निर्णयाचं जिल्ह्यात सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. पण, त्याचवेळेला मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना कसं रोखणार? इंटरनेटच्या आभासी जगात वावरताना मुलं अनेक गोष्टी पाहतात. त्यावर काय उपाय? असा प्रश्न देखील दुसऱ्या बाजुला आहेच. सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात पालक मुलांच्या हाती मोबाईल देतात. त्याचा परिणाम देखील मुलांवर होताना दिसत आहे. त्याबाबतचे काही अहवाल देखील प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे या साऱ्याबाबींवर पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचं मत देखील या क्षेत्रातले जाणकार सध्या व्यक्त करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रिकेट
Advertisement