Sharad Pawar : सध्या हनुमान चालीसा पुढं आणताहेत, यातून मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? शरद पवारांचा सवाल
Sharad Pawar : लोकांचे मूळ प्रश्न बाजूला सारून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
Sharad Pawar : सध्या राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरु आहे. जे मुळ प्रश्न आहेत ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सगळे सुरु असताना आपला मूलभूत प्रश्न सुटणार आहे का. केवळ सर्वांना मूलभूत प्रश्नांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी म्हटले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भटके विमुक्त बहुजन समाजाकडून कृज्ञता गौरव सन्मान सोहळा पार पडत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव घेता त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी म्हटले की, मध्यंतरी एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी फुले आंबेडकर, शाहू महाराज यांचं नाव घेतो. महात्मा फुलेंच नाव मी का घ्यायचं नाही, असा माझा त्यांना प्रश्न आहे. ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या पत्नीनं आपलं आयुष्य लोकांच्या शिक्षणासाठी घालावल त्याचं नाव घ्यायचं नाही का, असा प्रश्नही पवार यांनी केला. दुष्काळ असताना कैद्यांना खडी फोडण्याची शिक्षा न देता त्याऐवजी धरण बांधा अशी सूचना महात्मा फुले यांनी भारतात आलेल्या ब्रिटनच्या राजाला दिली होती असे सांगत महात्मा फुले हे दूरदृष्टी असलेले समाजसुधारक असल्याचे पवार यांनी म्हटले.
शाहु महाराज हे सामान्यांचे राजे होते. ते शहरात कधी राहिले नाहीत. संस्थानातील गोरगरिबाला भेटत असे. त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत रहायचे. आधुनिकतेचा विचार करणारे शाहु महाराज होते. त्याच नाव घ्यायचं नाही का, असा सवाल ही पवार यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान तयार केले. त्यासोबत देशाचे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी देशात मोठी धरणे बांधली. वीज निर्मिती केंद्रे उभारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव घ्यायचं नाही का असा सवाल ही त्यांनी केला.
भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी बैठकीचे आश्वासन
राज्यात अनेक जाती जमातीपर्यंत विकास पोहचला नाही. अजूनही भटक्या विमुक्त समाजातील तरुण वर्ग मागासलेला आहे. आज समाजाकडून 28 मागण्या करण्यात आल्या. एकदम सर्व मागण्या मान्य होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगताना म्हटले की, सर्वात आधी महत्त्वाच्या मागण्यांवर ठरवून त्यावर काम करा. राज्य मंत्रिमंडळातील संबंधित मंत्र्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.