(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton Production : कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ मात्र उत्पादनात घट, हवामान बदलाचा मोठा फटका; तज्ज्ञांची माहिती
Cotton : यावर्षी देशातील कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली तरी प्रतिकूल हवामानामुळे कापासाच्या उत्पादनात (Cotton Production) घट झाली आहे.
Cotton Production : सध्या कापूस (Cotton) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, आधीच पिकाला बसलेला हवामान बदलाचा (Climate Change) फटका, त्यात पुन्हा दरात घसरण झाली आहे. यावर्षी देशातील कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली तरी प्रतिकूल हवामानामुळे कापासाच्या उत्पादनात (Cotton Production) घट झाली आहे. यावर्षी उत्पादनात किमान 35 ते 40 टक्क्यांची घट झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सीएआयने (Cotton Association of India) यावर्षी देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, यावर्षी कापसाचे उत्पादन 290 ते 300 लाख गाठींवर स्थिरावणार असल्याची माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली आहे.
सध्या कापसाच्या दरात घसरण होत आहे. कापसाचे दर प्रति क्विंटल आठ हजार रुपयांच्या आसपास आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे.
पेरणी क्षेत्र वाढलं मात्र, उत्पादनात घट
देशभरात मागील वर्षीच्या तुलनेत सन 2022-23 च्या हंगामात कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढले आहे. त्यामुळं कापसाच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजकडून केला जात आहे. मात्र, हवामान बदलाचा मोठा फटका कापसाच्या पिकाला बसला आहे. त्यामुळं कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे अभ्यसकांनी सांगितले आहे.
या राज्यात कापूस उत्पादनात घट
देशात विविध राज्यात प्रतिकूल हवामान आणि अतिवृष्टीचा फटका कापूस पिकाला बसला आहे. हाती आलेलं कापसाचे पीक वाया गेले आहे. महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या मोठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान या छोट्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये देखील गुलाबी बोंडअळीमुळं कापसाचे उत्पादन घटल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. तसेच गुजरात, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन समाधानकारक असून, उत्पादकतेत वाढ झाल्याची माहिती अभ्यसकांनी दिली आहे.
दरात वाढ कधी होणार
यावर्षी कापसाच्या भावात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कापूस 9 हजार रुपये क्विंटलच्या आसपास गेला होता. त्यांनतर लगेच हा दर 8 हजार 200 वर आला. कापूस दरातील या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. दरात वाढ कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. कापूस जिनिंगसह सूतगिरण्यामध्ये मुबलक कापूस नाही. त्यामुळं वस्त्रोद्योग क्षेत्राला देखील याचा फटका बसतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या: