कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरी ट्राफिक पोलिसांची कारवाई; विक्रमी दंड वसूल!
प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करूनही लोक रस्त्यावर बिनदिकतपणे फिरताना दिसत आहेत. अशातच रत्नागिरी ट्रॅफिक पोलिसांन अनेकांवर कारवाई करत विक्रमी दंड वसुली केली आहे.
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते, बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. दरम्यान, यामध्ये रत्नागिरीकर किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक देखील कुठेच मागे नव्हते. रत्नागिरी शहर असो किंवा जिल्ह्यातील काही मुख्य ठिकाणं या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसून येत होती. प्रशासनानं केलेल्या आवाहनानंतर देखील त्याला हरताळ फासला जात होता. प्रत्येक जण केवळ मेडिकलला जात आहे असं उत्तर देताना दिसून येत होते. अनेकांनी तर, पाहुया बाहेरचं वातावरण आज कसं आहे? हे पाहण्यासाठी आलो आहे असं उत्तर दिलं. त्यामुळे वाहतूक पोलीस देखील काहीसे हतबल झालेले दिसून आले. अखेर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या आदेशानुसार या सर्व वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट, सिट बेल्ट नसणे, कागदपत्र नसणे आदी कारणांसाठी रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांवर अखेर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 1614 वाहन चालकांकडून 6 लाख 29 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी झालेली ही विक्रमी अशी कारवाई ठरली! वाहतूक पोलिसांनी नियमांवर बोट ठेवत केलेल्या कारवाईनंतर मात्र रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या हळूहळू कमी झाली. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. शिवाय, रात्रभर देखील पोलीस सध्या नाक्यानाक्यांवर लक्ष ठेवून आहेत.